थंडीत जितक्या मुबलक भाज्या आणि फळं मिळतात तितक्या उन्हाळ्यात मिळत नाहीत. एकतर उन्हाळ्यामुळे भाज्या महागतात त्यामुळे त्या परवडत नाहीत. इतकेच नाही तर आदल्या दिवशी घेतलेली भाजी कडक उन्हामुळे पार वाळून जाते. मग पैसे देऊन आणलेली ही भाजी फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. उन्हाळ्यात भूक कमी होते आणि त्यामुळे म्हणावे तसे जेवण जात नाही. अशावेळी काहीतरी वेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण कोणत्याही पदार्थावर हिरवीगार कोथिंबीर असली की त्याला एक वेगळा स्वाद येतो आणि दिसायलाही तो पदार्थ एकदम आकर्षक दिसतो. कोथिंबीरीमध्ये असणारे कॅल्शियम आणि इतर घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामुळे रोजच्या आहारात कोथिंबीरीचा आवर्जून समावेश करायला हवा.
बाजारातून आणलेली कोथिंबीर सतत वाळून जात असेल तर ताजी कोथिंबीर मिळण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे घरातल्या कुंडीत कोथिंबीर पिकवणे. कोथिंबीर ही शेतात लावली जाते, त्यामुळे ती घरात चांगली येईल की नाही असे आपल्याला वाटते. पण घरातील कुंडीत किंवा मोठ्या टबमध्येही हिरवीगार कोथिंबीर अतिशय छान येऊ शकते. विशेष म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ही ताजी कोथिंबीर तोडून आपण पदार्थावर घालू शकतो. कोथिंबीर येण्यासाठी धणे लावणे आवश्यक असल्याचे आपल्याला माहित आहे. मात्र चांगली कोथिंबीर येण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी समजून घेणे गरजेचे आहे.
१. कोथिंबीरीसाठी धणे पेरावे लागतात हे आपल्याला माहित असले तरी अनेकदा आपण कुंडीत धणे पेरल्यावर त्यातून रोप येत नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे धन्याची साले काहीवेळा जाडसर असतात, त्यामुळे या धण्याला कोंब फुटत नाही. अशावेळी धणे बारीक करुन ते कुंडीत पेरले जातात, पण त्याचा कोथिंबीर येण्यासाठी उपयोग होत नाही. अशावेळी तुम्हाला थोडे ओलसर हिरवे धणे मिळाले तर त्यातून लवकर रोप येऊ शकते. तसेच कोथिंबीर येण्यासाठी जास्त धण्यांची आवश्यकता असते, कारण प्रत्येक बीतून रोप येईलच असे नाही.
२. आपण कोथिंबीर लावायची म्हटली की नेहमीप्रमाणे कुंडीत धणे घालतो. पण कुंडीत एखादे रोप चांगल्या पद्धतीने वाढू शकते. कोथिंबीर ही पसरट जागेत चांगली येऊ शकते. कोथिंबीरीच्या अनेक काड्या असल्याने त्या वाढण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक असते. त्यामुळे कोथिंबीर लावताना एखादी मोठी पसरट कुंडी किंवा घरातील न लागणारा एखादा टब, थर्माकोलचा बॉक्स यांचा वापर करावा. दोन ते तीन कुंड्यांमध्ये किंवा थोड्या मोठ्या जागेत कोथिंबीर लावल्यास आपल्याला नेहमी ताजी टवटवीत कोथिंबीर वापरायला मिळू शकेल.
३. आपण इतर झाडांना ज्याप्रमाणे भरपूर पाणी घालतो त्याप्रमाणे कोथिंबीरीला जास्त पाणी घालून चालत नाही. कारण कोथिंबीर ही अतिशय नाजूक असते. कोथिंबीरीला प्रमाणापेक्षा जास्त पाणी घातल्यास मातीमध्ये चिखल होतो. तसेच यातून येणारा कोंब नाजूक असल्याने जास्त पाणी झाल्यास ते कोंब कुजून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक तितकेच पाणी घातलेले चांगले.
४. उन्हाळ्याच्या दिवसांत कोथिंबीरीला कोंब फुटेपर्यंत कुंडी किंवा टब सूर्यप्रकाशात ठेवावा. पण एकदा कोंब फुटला की ही कुंडी किंवा टब थोडा सावलीत ठेवला तरी चालतो. नाहीतर प्रखर उन्हामुळे ही नाजूक रोपे वाळून जाण्याची शक्यता असते.
५. मातीमध्ये धणे पेरल्यानंतर त्यावर पुन्हा मातीचा थोडा जाडसर थर द्यावा. या धन्याला कोंब फुटण्यासाठी किंवा अंकुर येण्यासाठी ८ ते १० दिवस लागतात. त्यामुळे मधल्या वेळात माती उकरुन पाहणे, सतत त्या कुंडीशी खेळत राहणे असे करु नये. कोथिंबीर पूर्ण तयार व्हायला साधारण ३५ ते ४० दिवस लागतात, हे लक्षात घेऊन मगच कोथिंबीर तोडावी.