अंजना देवस्थळे
जंगलात, राना-वनात, शहरातही उंच वृक्षांच्या बुंध्यांवर नवीन कोरी चकचकीत सळसळती रेशमी पानं गुंडाळून, गळ्यात फुलांच्या माळा बांधून नववर्षाच्या स्वागताला निसर्ग सज्ज असतो. हाच आनंदाचा, चैतन्याचा, नवनिर्मितीचा गुढीपाडवा!
शिशिर ऋतूत सुप्त अवस्थेत निष्पर्ण झालेले, बोडक्या फांद्यांचे वृक्ष गंभीर रुप धारण करतात. थंडी कमी झाली की, असे अचानक जागे होतात. फुलण्याची - बहरण्याची अशी घाई की, पानं फुटण्याची वाट न बघता फुलांनी नखशिखांत रंगांनी भरून जातात. भगव्या रंगाचा पळस, पिवळा धम्मक बहावा, गोड गुलाबी सावर, लालसर केशरी पांगारा, पिवळट शिवण, निळसर - जांभळी अंजन... असे अनेक वृक्ष भरभरून फुलतात.
निसर्ग उत्साहाने थपथपतो. रस, रंग, गंध आणि पाठोपाठ स्वरही!
हा मौसम पक्ष्यांचा दाखवण्याचा आणि मिलनाचाही असतो. मग नर पक्षी नटूनथटून, नवे पोशाख परिधान करून झाडांवर शिट्या मारत फिरतात. पक्ष्यांचे प्रजनन, पिसारे (ब्रिडिंग प्लमेज) बघावे ते आता. बगळ्याचा डोक्यावरचा तुरा, शिंजिर पक्ष्याचा तुकतुकीत चकचकीत जांभळा रंग, मोराचा पिसारा... असे नर मिरवायला सज्ज होतात.
रंगच नव्हे तर पक्ष्यांचे आवाजही बदलतात बरं.
वर्षभर गप्प बसलेल्या कोकीळेला कंठ फुटतो, बुलबुल शिट्या मारायला लागतो, मैनांचे कर्कश स्वर सुरेल होतात. अशा अनेक शिट्या, शिळ, मंजूळ गाणी झाडा-झुडपातून नववर्षाचं स्वागत करतात.
वसंताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्रपालवी.
पानांचं, पालवीचं फुलांएवढंच मनोहारी दृश्य. रंगांच्या छटांमध्ये फुलांसारखीच विविधता. फुलांच्या रंगाच्या तोडीस तोड पानांचे रंग, त्यांच्या विविध मोहक छटा.
अश्वत्थ - बोधी वृक्ष असे गंभीर नाव पेलणारा पिंपळ. चैत्रात ' अजून यौवनात मी' असं रुप घेतो. चैत्रात त्याच्या लांब देठांवर, तांबूस - गुलाबी पालवी सळसळते. तेव्हा मात्र त्याभोवती गांभीर्य नव्हे तर पानोपानी अवखळता रोमांच असतो. याचे रंग कसे एकसे - एक शेड्समध्ये बदलत जातात. गुलाबी, गडद गुलाबी मग तांबुस - गुलाबी, गुलाबी संपत आला की, फिकट हिरवा, रेडिअम हिरवा, पोपटी आणि मग तो शांत - चकचकीत हिरवा.
याच काळात कळतं की, मुंबईसारख्या शहरातही अजून बरेच पिंपळ शिल्लक आहेत.
पिंपळ्यातल्याच कुळातलं पाखड नावाचा वृक्ष, त्याची रंगत आणखीनच न्यारी. नवीन पालवी फुटायच्या आधी जे कोंब येतात, त्यांच्या संरक्षणार्थ उपपर्ण असतात. तर या पाखडाचे उपपर्ण इतके लाल भडक असतात की, याचं इंग्रजी नाव पडलंय लिपस्टिक फायकस! कोंब असे तर मग पालवी कशी?
तीच रंगांची उधळण, पिंपळासारखी, गुलाबी लालसर, केशरी मंत्रमुग्ध करणारे रंग!
गावाकडे, एक वेगळाच राजबिंडा वृक्ष आपली रंगीत पालवी घेऊन दिमाखात उभा दिसतो. राजबिंडा असा की नाजूक, गुलाबी रंग नाही तर राकट तांबूस रंग असतो याचा. ताम्र रंगाच्या विविध छटा बघाव्या तर या वृक्षावर वनवासी बांधवांची जीवनरेषा, कल्पवृक्षच... 'मोह'.
चैत्रात मात्र मोहक मदनाचा पुतळा दिसतो, अत्यंत मोहक! रुक्ष, उष्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा आल्हाददायक लालसर तांबूस रंग उठून दिसतो.
चैत्रपालवीची सर्वांत जास्त मजा दिसते ती 'लाल रंगाच्या लावण्य वृक्ष' कुसुंबच्या पालवीत. कुसंबी रंगाचं नाव याच्यावरूनच पडलं आहे. लाल-जांभळ्या पोपटी चुटूक रंगाच्या मिश्रणाची पालवी असलेला हा अप्रतीम सौंदर्याचा वृक्ष. एवढा रंगीत वृक्ष फुलांनी नव्हे, तर पानांनी भरला आहे, असं पटवून द्यावं लागतं.
चैत्रपालवीची गंमत म्हणजे निव्वळ हिरवा रंगदेखील खुलून उठतो. एक सामान्य आणि परिचित वृक्ष म्हणजे करंज. गावात, शहरात रस्त्याच्या कडेला दिसणारा सामान्य वृक्ष चैत्रात हिरो बनतो. हिरव्या रंगाच्या एवढ्या छटा दाखवतो की बस, दिल खूश! पहिल्यांदा पिवळट हिरवा, मग पोपटी, मग पारदर्शक हिरवा, असं करत गडद पाचूसारखी. जंगली बदाम हादेखील शहरी वृक्ष, याची पंजाकृती पानंदेखील पालवीच्या रंगांची उधळण करतात, पण उंच आकाशात शेंड्याकडे असल्यामुळे डोकं वर करून कौतुक करणार कोण?
हे सगळे वृक्ष, पानगळ होणाऱ्या वृक्षांचे! त्यामुळे त्यांना फुटलेली पालवी लगेच डोळ्यात भरते. पण, काही वृक्ष सदाहरीत असतात. त्यांची नवीन पालवी, ती बरं कशी असते? याच दिवसात आंब्याला मोहोर आलेला असतो. कैऱ्या पण धरलेल्या असतात. याच वेळी नवीन पालवीही फुटते. जुन्या हिरव्यागार पालवीच्या पार्श्वभूमीवर नवीन लुसलुशीत गुलाबी पालवी जास्त उठून दिसते. लाल भडक पालवी, मधेच मोहोर, कैऱ्या आणि हिरवीगार पालवी, सगळे एकाच झाडावर असल्याने हा लेकुरवाळा आम्रवृक्ष आणखीनच मोहक दिसतो.
काहीच ठिकाणी दिसणारा दुर्मीळ असा नागचाफादेखील याच गटातला. हिरव्या पार्श्वभूमीवर गडद, लाल चकचकीत पालवी. पण, सर्वांत शोभनीय दिसतो तो सीता - अशोक. याची पालवी म्हणजे पानांचे झुंबरच जणू. कालिदासाच्या नायिका अंबाड्यात माळत असत. यांचा स्पर्श अहाहा! कोवळा, नाजूक, मुलायम, ओलसर, रेशमी...
आपला वसंत, चैत्र महिना म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. सकाळी जरी जरा सुखावह असलं तरी दुपारी मात्र रणरणतं ऊन, भगभगता सूर्य, उष्मा, पाण्याचा - ओलाव्याचा पत्ता नाही आणि त्यात ही नवजात कोवळी पालवी कशी टिकते बरं?
ही नाजूक पालवी, त्यांच्या या लाल रंगामुळे टिकून राहात असावी का?
हा लाल रंग त्यांचा सुरक्षाकवच असेल?
निसर्गाची ही किमया पाहत राहावी.
(लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
anjanahorticulture@gmail.com