इडली, डोसा, केक, पेस्ट्रीज असे वेगवेगळे पदार्थ बेकिंग सोडा घातला की अधिक फुलून येतात. खरंतर ते पदार्थ फुगावेत, फुलावेत यासाठीच त्यात बेकिंग सोडा घालण्यात येत असतो. आता हाच बेकींग सोडा आपली बाग फुलविण्यासाठीही अतिशय उपयुक्त असतो. आजवर स्वयंपाक घरात, एखाद्या रेसिपीमध्ये बेकिंग सोड्याचं कौशल्य आपण पाहिलं आहे, आता याच बेकिंग सोड्याची आपल्या टेरेस गार्डनमधील करामतही पाहू या..
बेकिंग सोड्याचे गार्डनमधील उपयोग१. फुलं छान येण्यासाठीबऱ्याचदा गुलाब, जास्वंद या झाडांच्या बाबतीत असं होतं की रोपट्याची पानं हिरवीगार, छान असतात. झाडांना कळ्याही भरपूर येतात. पण त्या कळ्यांना नेमकी कीड लागते. त्यामुळे कळीचं छान फुल होत नाही, तिची वाढ खुंटते किंवा पाकळ्या झटपट गळून जातात. फुलांवरचा हा रोग घालविण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. ही समस्या घालविण्यासाठी १ लीटर पाणी घ्या, त्यात १ टी स्पून बेकींग सोडा टाका आणि हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. कळी येऊ लागली की दोन ते तीन दिवस तिच्यावर हे मिश्रण फवारा. मिश्रण फवारताना ते व्यवस्थित हलवून घ्यावे.
२. रोपट्यावर कीड, रोग पडला असल्यास...अनेकदा एखाद्या रोपट्यावर पांढरट, भुरकट किंवा रवाळ कीड दिसून येते.. किंवा एखादा रोग पडून झाडाच्या पानांना छिद्र पडू लागतात. कुंडीतील मातीला किंवा झाडाच्या खोडाला, फांद्यांना किंवा मातीला बुरशी येऊ लागते. ही कीड, बुरशी, रोग घालविण्यासाठी १ लीटर पाणी घ्या. त्यात २ टी स्पून बेकिंग सोडा, १ टी स्पून नीम ऑईल टाका. नीम ऑईल नसेल तर कोणतंही व्हेजिटेबल ऑईल टाका. त्यात लिक्विड सोपचे १० थेंब टाका. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि झाडावर आठवड्यातून एकदा- दोनदा टाका. आधी एखाद्या पानावर मारून पॅच टेस्ट करून बघा आणि त्यानंतरच हे मिश्रण सगळ्या झाडावर फवारा..
३. झाडाची पानं स्वच्छ करण्यासाठी पानांवरची धुळ काढून ते स्वच्छ करण्यासाठीही बेकिंग सोडा वापरता येतो. यासाठी १ लिटर पाणी घ्या. त्यात अर्धा टी स्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण झाडांवर फवारा. यामुळे पानं तर स्वच्छ होतातच, पण झाडांना छान चमकही येते.
४. टेरेस गार्डनची स्वच्छता करण्यासाठीगार्डनमधील कुंड्या, अवजारं, बादल्या किंवा मग टेरेस फर्निचर यांची स्वच्छता करण्यासाठीही बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. यासाठी २ टीस्पून बेकिंग सोडा आणि २ टी स्पून लिक्विड सोप १ लीटर पाण्यात टाका. आता या पाण्याने गार्डनमधील वस्तूंची साफसफाई करा.