आपण घरातील बागेत अतिशय आवडीने काही ना काही झाडे लावतो. त्याला नित्यनेमाने पाणी घालतो. कधीतरी एखाद्या विकेंडला त्याची छाटणी करुन बाजारात मिळणारं एखादं खतही घालतो. मात्र या पलिकडे आपण त्या झाडाची फारशी काळजी घेत नाही. काही वेळा झाडांना अचानक कीड लागायला सुरुवात होते आणि त्या विशिष्ट झाडावर तर किड लागतेच पण त्याच्या आजुबाजूच्या झाडांवरही ही किड पसरते. जास्वंदाचे झाड अनेकदा आपल्याला गावाकडे रस्त्याच्या बाजूलाही दिसते आणि घरातील कुंडीतही हे झाड खूप छान वाढते. एकदा जास्वंद वाढायला लागला की त्याला भरपूर फुलं येतात. गणपती बाप्पाला वाहण्यासोबतच जास्वंदाचे तेल करणे किंवा सौंदर्याच्या इतरही काही गोष्टींसाठी जास्वंद आवर्जून वापरला जातो. आता जास्वंदाला कीड लागली तर कोणते उपाय करायचे याविषयी जाणून घेऊया (Home Remedies for Controlling Pests of Hibiscus Plant Gardening Tips).
जास्वंद लावताना...
इतर झाडे आपण मातीत लावतो आणि नंतर थोडे थोडे खत घालतो. पण जास्वंद लावताना मातीमध्ये शेणखत किंवा गांडूळ खत, कोकोपीट, वाळू यांचे प्रमाण देखील सगळे मिळून जवळपास ५० टक्के ठेवावे. बाकी ५० टक्के माती असावी.जास्वंदाच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाशाची गरज आहे. त्यामुळे हे झाड शक्यतो जिथे भरपूर उन येईल तिथेच ठेवावे. जेवढ्या जास्त फांद्या तेवढी जास्त फुले येतात. त्यामुळे जास्वंदीला सतत छाटत राहिले पाहिजे. म्हणजे झाडाची उंची न वाढता डेरेदार झाड तयार होऊन जास्त फुले येतात. केळीची साले, कांद्याची टरफले यांचे पाणी खत म्हणून वापरु शकता. तसेच उकडलेल्या बटाट्याच्या सालांचाही जास्वंदाला खत म्हणून चांगला उपयोग होतो. अशाप्रकारे नियमित काळजी घेतल्यास व्यवस्थित पोषण मिळून झाडाची चांगली वाढ होते.
कीड लागल्यास घरच्या घरी करता येतील असे उपाय
१. बेकींग सोडा
घरात बेकिंग पावडर असतेच. झाडांची ही बुरशी घालवण्यासाठी एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा हॉर्टिकल्चर ऑइल ( नर्सरीमधे मिळते) २ लिटर पाण्यात घालावं. ते चांगलं घोळून घेतल्यावर झाडाला जिथे बुरशी असेल तिथे स्प्रेने हे मिश्रण झाडांवर फवारावं. बुरशी घालवण्याचा हा उत्तम उपाय आहे. घरच्याघरी हॉर्टिकल्चर ऑइल तयार करता येतं. बुरशी जाईपर्यंत तयार केलेले हे मिश्रण रोज जास्वंदाच्या झाडावर फवारावं.
२. कडूलिंब
कडूलिंबामधे कीडविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग झाडांवरील कीड घालवण्यासाठीही करता येतो. यासाठी कडूलिंबाची भरपूर पानं घ्यावीत, ती मोठ्या भांड्यात पाण्यात भिजवून ठेवावीत. सकाळी हेच पाणी चांगलं उकळून घ्यावं. थंड करुन हे पाणी स्प्रे बॉटलमधे भरुन झाडांवर फवारावं. कीड असेपर्यंत हे करत राहावे, त्याचा कीड जाण्यास फायदा होतो. झाडांवर कीड नसली तरी झाडांचं कीडीपासून संरक्षण होण्यासाठी आठवड्यातून एकदा कडूलिंबाचा काढा फवारावा.
३. हळद
हळद देखील अॅंटिबॅक्टेरिअल आहे. त्यामुळे फुलझाडांवरील कीड मारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. बऱ्याचदा मातीत कीड असेल तर ती झाडांवर लागून फुलं खराब होतात. यासाठी कीड मुळापासून नष्ट करायला हवी. जर तुम्ही एक किलो माती झाडात वापरली असेल तर एक चिमूट भर हळद मातीत मिसळा आणि त्यात पुरेसे पाणी टाका. त्यामुळे हळद मातीत मिसळेल आणि कीड नष्ट होईल.