Join us  

प्लास्टीकच्या बाटल्यांचा घरात पसारा झाला? बघा ही खास ट्रिक-१ रुपयाही खर्च न करता सजवता येईल सुंदर बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 5:07 PM

How To Decorate Home Garden Easy Ideas : टाकाऊतून टिकाऊ असं काही करुन आपण घराचं रुप बदलू शकतो.

घर सजवणे ही एक कला आहे, ती सगळ्यांनाच जमते असं नाही. ज्यांना या गोष्टीची आवड असते किंवा दृष्टी असते त्या महिला अतिशय बारकाईने आपले घर सजवतात. अनेकदा या गोष्टीची आवड असली तरी सवडही असावी लागते. घर सजवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या वस्तूच लागतात असं काही नाही तर घरात पडून असणाऱ्या गोष्टींपासूनही टाकाऊतून टिकाऊ असं काही करुन आपण घराचं रुप बदलू शकतो. त्यासाठी आपल्याकडे थोडीशी कल्पक दृष्टी असावी लागते. आजकाल इंटरनेटवर गोष्टी अतिशय सहज उपलब्ध असल्याने त्याची मदत घेऊनही आपण घराचं रुप नक्कीच बदलू शकतो. विशेष म्हणजे अशापद्धतीने घर सजवायचं असेल तर त्यासाठी अक्षरश: १ रुपयाही खर्च येत नाही. घरात पसारा म्हणून पडून असलेल्या प्लास्टीकच्या बाटल्यांचा गॅलरी सजवण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो हे आपण अनेकदा ऐकतो. पण प्रत्यक्षात तो उपयोग कसा करायचा ते पाहूया (How To Decorate Home Garden Easy Ideas)...

१. प्लास्टीकच्या बाटलीचा वरचा, मधला आणि खालचा असे पेनाने तीन भाग करुन घ्यायचे. वरचा टोपण असलेला भाग आणि सगळ्यात खालचा भाग आपण वापरणार आहोत. बाटलीच्या खालचा भाग थोडा वेगळ्या आकाराचा असेल तर डीझाईन म्हणून ते जास्त छान दिसायला मदत होईल. या खालच्या कापलेल्या भागाच्या मध्यभागी बाटलीचे तोंड आहे त्या मापाचा गोल कापून घ्यायचा. टोपण काढून हा गोल कापलेला भाग या तोंडातून आत घालायचा आणि टोपण पुन्हा लावून टाकायचे. म्हणजे आपल्याला चांगला बेस मिळण्यास मदत होईल. आता ते उलटे ठेवून तोंडाच्या खालचा जो बाटलीचा भाग आहे त्यात माती भरायची आणि आपल्या आवडीची रोपे लावायची. यामध्ये साधारण कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असणारी, शोभेच्या फुलांची, विविध रंगाच्या पानांची रोपे लावल्यास ती जास्त छान दिसतात. गॅलरीत ठेवण्यात येणाऱ्या रोपांच्या स्टँडवर या कस्टमाइज कुंड्या ठेवल्या तर त्याचा जास्त चांगला उपयोग होतो. 

२. याशिवाय वेलींसाठी किंवा लहान आकाराच्या डीझायनर रोपांसाठी लटकणारे काहीतरी छान करायचा विचार असेल तर त्यासाठी आज आपण आणखी एक गोष्ट पाहणार आहोत. या प्लास्टीकच्याच बाटल्यांच्या वरचा भाग कापून तो उलटा करायचा आणि त्याच्या दोन्ही बाजुने थोड्या कलरफूल अशा लेस किंवा नाड्या लावायच्या. वरती थोड्या मोठ्या आकाराच्या बाटलीचे प्लास्टीक, न लागणाऱ्या सीडी, डीव्हीडी, पुठ्ठा असे काहीही लावू शकतो. या वरच्या गोष्टीला या नाड्या जोडून या बाटल्यांच्या छोट्या कुंड्या खाली सोडायच्या. त्या एकसारख्या न लावता थोड्या वर-खाली लावल्यास अतिशय छान दिसतात. यामध्येही विविध रंगाच्या फुलांची लहान आकाराची शोभेची रोपे लावता येऊ शकतात. गॅलरीत किंवा घराच्या प्रवेशद्वारापाशी आपण अशाप्रकारचे काही नक्की करु शकतो. ज्यामुळे घराची शोभा वाढण्यास नक्कीच मदत होते. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स