कोथिंबीरीशिवाय स्वंयपाक अपूर्ण आहे. कारण कोणत्याही भाजीत चव येण्यासाठी तसंच सजावटीसाठी कोथिंबीर वापरली जाते. कोथिंबीर खाल्ल्यानं आरोग्यालाही फायदे मिळतात. भाजी खरेदी करताना कोथिंबीरही आपण विकत घेतो (Home Gardening). कोथिंबीर जास्तीची आणून ठेवली की अनेकदा पिवळी पडते, खराब होते. घराच्याघरी छोट्या कुंडीत कोथिंबीरीचं रोप लावून तुम्ही ताजी कोथिंबीर मिळवू शकता. कोथिंबीर घरच्याघरी कशी लावायची याची सोपी पद्धत पाहूया. (How to Grow Coriander At Home)
कोथिंबीरीचे रोप लावण्याची योग्य पद्धत
१) कोथिंबीर लावण्यासाठी तुम्हाला एक कुंडी, चांगल्या गुणवत्तेची माती, धण्याच्या बीया, पाणी शिंपण्याचा स्प्रे आणि खत लागेल. अशा कुंडीची निवड करा ज्यात खाली छिद्र असेल जेणेकरून त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जाईल.
२) कुंडीत चांगल्या गुणवत्तेची माती भरा माती हलकी ओली असेल अशी पाहा. मातीच्या बेसवर हलक्या हातांनी धण्यांच्या बिया घाला. बियांवर पुन्हा थोडी माती घालून झाका आणि वरून पाणी शिंपडा. सुर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल अशा जागी कुंडी ठेवा.
३) मातीत मॉईश्चर असेल असं पाहा. जास्त पाणी घातल्यानंतर रोपं खराब होऊ शकतं. आठवड्यातून एकदा तुम्ही कोथिंबीरीच्या रोपात खत घालू शकता.
४) जवळपास ३ ते ४ आठवड्यात तुम्ही कोथिंबीरीच पानं तोडून वापरू शकता. नियमित पानं काढत राहिल्यानं कोथिंबीरीच्या रोपाला नवीन पानं येतील.
गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? 'या' भाजीची सालं कुंडीत घाला, गुलाबाच्या रोपाला नॅचरल टॉनिक
ऑलदॅडग्रोजच्या रिपोर्टनुसार कोथिंबीरीच्या रोपाची मुळं कुजण्याची समस्या उद्भवू शकते. जर झाडाची मुळं खूपच ओली झाली असतील तर ही स्थिती उद्भवते. त्यामुळे झाडाचा निचरा सुधारण्यासाठी मिश्रिक वाळू असलेली माती वापरायला हवी. जास्त पाण्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होते आणि पानांचे रोग होऊ शकतात. हे टाळण्यासाठी साधी खबरदारी घ्यावी ती म्हणजे रोपाला सकाळी पाणी घ्या. संध्याकाळी जास्त प्रमाणात पाणी देऊ नका.
कोथिंबीरीच्या रोपासाठी तुम्ही घरगुती खत किंवा खताचं पाणीसुद्धा वापरू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी साधं पाणी घाला. या रोपाला किड लागल्यास कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून या द्रावणाचा स्प्रे रोपावर मारा. हिवाळ्यात रोपाची जास्त देखभाल करण्याची आवश्यकता असते.