गणपतीला वाहिलेली फुलं, रोजचा हार, कंठी, डेकोरेशनसाठी वापरलेली फुलं हे सारं घरात असतंच. गणपती त्यांच्या घरी गेले की सुनी मखर आणि निस्तेज फुलांचे निर्माल्य फार उदास करते. काही घरी दहा दिवसांचे निर्माल्य राखून ठेवतात. आणि मग एकदम गणपतीविसर्जनासह पाण्यात सोडतात. खरं तर पिण्याच्या पाण्याच्या प्रवाहात निर्माल्यानं भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या सोडणं चूक. निर्माल्याची आपण घरीच काही नीट व्यवस्था केली तर त्यातून नवीन सुंदर गोष्टी करता येतात. खत म्हणून तर निर्माल्य आपण वापरतोच. कुंडीत भरुन ठेवले, त्यावर नारळाच्या शेंड्या, सुकलेली पानं, थोडी माती, गांडूळ खत घालून ठेवून दिलं तर काही दिवसातच खत तयार होवू शकते. असे खत घरगुती झाडांसाठी उत्तम.
निर्माल्याची फुलं फेकू नका. फुलं, लिंबाची सालं, संत्रीची सालं, डाळींबाची सालं वाळवून त्यापासून उत्तम स्क्रबही तयार होवू शकतो.
मात्र त्यासोबतच या दोन खास आयडिया..
(Image : Google)
फुलांचे धूप
निर्माल्याची फुलं सुकवायची. आता ऊन कमी आहे पण जेवढं ऊन पडेल त्या उन्हात फुलं वाळवायची. मिक्सरमध्ये फिरवून त्यांची बारीक भुकटी करायची. मग त्यात अंदाजे तूप आणि कापूर भूकटी घालून लहान लहान गोळे करायचे. ओलसर लागतात गोळे. चॉकलेट ट्रे असेल तर त्या आकारात ते सारण भरुन कडक वाळवून घ्यायचं. ऊन्हात आठ दिवस कडक वाळवायचं.
चांगले कडक वाळले की आपल्या घरात सुगंधी धूप तयार.
अतिशय सौम्य सुगंधाचा धूप घरी वापरण्यासाठी असा तयार करता येतो.
(Image : Google)
फुलांचे तेल..
फक्त जास्वंदच नाही तर उपलब्ध सर्व फुलं खोबरेल तेलात चांगली उकळवून घ्या. आणि ते तेल केसांना लावण्यासाठी अतिशय उपयुक्त. तुम्ही हे तेल कुणाला भेट म्हणूनही देऊ शकतात.