Join us  

रोपट्यांसाठी विकतचं खत कशाला? घरातलाच ओला कचरा वापरून करा परफेक्ट कंपोस्ट खत, बघा कसं करायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 5:51 PM

How To Make Perfect Compost at Home : घरच्या घरी तयार केलेले खत आपल्या झाडांना मिळाल्याने झाडांची छान वाढही होण्यास मदत होते.

ठळक मुद्देओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी तयार होईल घरातल्या बागेसाठी कंपोस्ट खतपाहा घरी कंपोस्ट खत करण्याची सोपी पद्धत

आपल्या गॅलरीत किंवा अगदी खिडकीच्या ग्रीलमध्ये, दारात आपण काही ना काही रोपं आवडीने लावतो. रोपांची पुरेशी काळजी घेण्यासाठी आपण विकेंडला कधी त्याची कापणी करतो तर कधी त्यात खत घालून ही रोपं वाढावीत आणि त्यांना छान फुल यावीत यासाठी त्यांची मशागत करतो. बाजारात मिळणारी कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत यांसारखी खतं बरीच महाग मिळतात. त्यापेक्षा आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करु शकतो (How To Make Perfect Compost at Home). 

यामुळे घरातल्या ओल्या कचऱ्याचाही चांगला विनियोग होतो आणि घरच्या घरी तयार केलेले खत आपल्या झाडांना मिळाल्याने झाडांची छान वाढही होण्यास मदत होते. आता हे कंपोस्ट खत नेमके कसे तयार करायचे असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत करण्याची पद्धत पाहूया...

(Image : Google)

कसे करायचे कंपोस्ट खत 

१. कंपोस्ट खतासाठी साधारणपणे मातीची कुंडी किंवा खराब झालेला माठ घ्यावा. मातीच्या भांड्यात कंपोस्ट चांगले तयार होते. अगदीच नसेल तर प्लास्टीकचा डबा, बादली असेही चालू शकते. मात्र यामध्ये हवा खेळती राहायला हवी.

२. यामध्ये सगळ्यात खाली नारळाच्या शेंड्या घालाव्यात. त्यावर मातीचा एक थर द्यावा. 

३. मातीच्या थरावर घरातील ओला कचरा घालावा. यामध्ये भाज्यांची देठे, फळांची साले, अंड्याची टरफले, लसणाच्या साली अशा सगळ्या गोष्टी चालू शकतात. 

४. त्यावर पानांचा पालापाचोळा, विघटनशील कोरडा कचरा घालावा. यावरु पुन्हा एक मातीचा थर द्यावा.

(Image : Google)

५. हे खत चांगले तयार होण्यासाठी यामध्ये ताक किंवा गुळाचे पाणी घालावे. म्हणजे त्यात जीवाणी तयार होण्यास मदत होते. यामध्ये ओला कचरा असल्याने पाणी घालण्याची आवश्यकता नसते. हा कचरा कुजतो आणि त्यापासून चांगले खत तयार होते. 

६. दर २ दिवसांनी यामध्ये आपण ओल्या कचऱ्याची भर घालू शकतो. मात्र हे खताचे भांडे पुरेपूर भरु नये. त्यात खत तयार होण्यासाठी थोडी मोकळी जागा असायला हवी. 

७. साधारणपणे ३ ते ४ महिन्यांत हा कचरा पूर्णपणे कुजल्यानंतर कंपोस्ट खत चांगल्यारितीने तयार होते. या खतामुळे आपल्या रोपांना चांगले पोषण तर मिळतेच पण आपला खताचा खर्च वाचतो आणि घरातील ओल्या कचऱ्याचाही चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स