Join us  

लालबुंद टोमॅटोंनी लगडेल रोप, बघा बाल्कनीतल्या कुंडीमध्ये टोमॅटाे लावण्यासाठी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 2:31 PM

Gardening Tips For Tomato Plant: बघा कुंडीमध्ये कसं लावायचं टोमॅटोचं रोप, इतकं बहरेल की टोमॅटो विकत घेण्याची गरजच नाही...(how to plant tomato in pot?)

ठळक मुद्देटोमॅटोच्या रोपाला नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे पदार्थ भरपूर प्रमाणात लागतात. त्यामुळे तशा पद्धतीचं खत रोपाला द्या.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे बरेच जण हौशीने वेगवेगळी रोपं लावत आहेत. या दिवसांत लावलेली रोपं पटकन रुजतात आणि छान फुलतात. त्यामुळे या दिवसांत जास्तीतजास्त रोपांची खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. आता टोमॅटो, मिरची, आलं, कोथिंबीर, पुदिना अशा रोजच्या स्वयंपाकात उपयोगी ठरणाऱ्या भाज्या कुंडीमध्ये लावण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. या रोपांची थोडीशी काळजी घेतली आणि त्यांच्या उन्हाचं, खताचं गणित आपल्याला जमलं की मग ही सगळीच रोपं खूप छान फुलून येतात (kitchen garden tips). त्यामुळे यंदा तुम्हालाही टोमॅटोचं रोप कुंडीमध्ये लावायचं असेल तर त्यासाठी या काही खास टिप्स पाहा (how to plant tomato in pot). काही आठवड्यांतच लालबुंद टोमॅटोंनी तुमचं छोटंसं रोप अगदी लगडून जाईल. (gardening tips for tomato plant)

 

कुंडीमध्ये कसं लावायचं टोमॅटोचं रोप?

टोमॅटोचं रोप कुंडीमध्ये लावण्यासाठी तुमच्याकडे मध्यम आकाराची कुंडी असणं गरजेचं आहे. 

कुंडीमध्ये माती भरण्यापुर्वी कुंडीच्या तळाला पाण्याचा निचरा होण्यासाठी जी लहान छिद्रं असतात, त्यावर विटांचे किंवा खापरांचे तुकडे ठेवा. जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि माती वाहून जाणार नाही.

त्यानंतर मग कुंडी भरायला सुरुवात करा. टोमॅटोच्या रोपाला खूप चिकट माती नको असते. त्यामुळे तुम्ही जी माती कुंडीमध्ये भराल त्यामध्ये १० टक्के कोकोपीट, २० टक्के वाळू किंवा रेती, २० टक्के कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत आणि उर्वरित ५० टक्के माती असं प्रमाण ठेवा.

 

बिया रुजवून रोप उगवायला खूप वेळ लागतो. त्यामुळे तुमच्या शहरातल्या नर्सरीमध्ये जाऊन टोमॅटोचं रोप आणलं तर कमी वेळात टोमॅटो यायला सुरुवात होईल. शिवाय बिया लावून उगवलेल्या रोपाची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. त्या तुलनेत नर्सरीतून आणलेलं रोप वाढवणं सोपं जातं. 

टोमॅटोच्या रोपाला नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे पदार्थ भरपूर प्रमाणात लागतात. त्यामुळे तशा पद्धतीचं खत रोपाला द्या. केळीची सालं १- २ दिवस पाण्यात भिजत घालायची. आणि नंतर गाळून ते पाणी रोपाला द्यायचं. हे टोमॅटोसाठी उत्तम घरगुती खत ठरू शकतं. 

एकदा रोप लावल्यानंतर सुरुवातीचे १०- १५ दिवस ते प्रखर सुर्यप्रकाशात किंवा खूप पावसात ठेवू नका. तसेच खूप पाणी टाकू नका. कुंडीतल्या मातीचा वरचा थर कोरडा पडल्यानंतरच पाणी द्या. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सटोमॅटोइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बाग