झाडांचही आपल्यासारखंच असतं. आपण कसं वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारात, कपड्यांमध्ये, रोजच्या काही सवयींमध्ये बदल करत असतो, तसाच बदल आपल्या झाडांनाही अपेक्षित असतो. उन्हाळ्यात झाडांची वेगळी काळजी घ्यावी लागते, पावसाळ्यात वेगळी आणि हिवाळ्यातही झाडांच्या गरजेनुसार आपल्याला गार्डनिंग पद्धतीत बदल करावा लागतो. आता कडक उन्हाळा संपून पावसाचे वेध लागले आहेत.. आपण छत्री, रेनकोट घेऊन आपली तयारी करून ठेवलीच आहे. आता झाडांचीही पावसाळ्याच्या दृष्टीने काही तयारी करूया... (gardening tips for rainy season)
पावसाळ्यापुर्वी झाडांसाठी करा या काही गोष्टी
१. कुंड्यांमध्ये माती भरा
उन्हाळ्यात आपण कुंडीतील माती कमी करतो. जेणेकरून झाडांना जास्तीतजास्त पाणी देता येईल. पण पावसाळ्यात कुंडीमध्ये जास्त पाणी साचून राहण्याची गरज नसते. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी कुंडीमध्ये माती भरून टाका. कुंडीचा वरचा काठ आणि मातीचा थर यात जास्तीतजास्त दोन ते अडीच सेमी एवढंच अंतर असावं. कारण जास्त पाणी साचून राहीलं तर झाडं खराब होऊ शकतात. माती भरताना त्यात कोकोपीट आणि गांडूळ खतही टाकावं.
२. कुंड्यांची छिद्रे तपासा
काही कुंड्यांमधून पाणी अजिबातच झिरपत नाही. त्या कुंड्यांच्या खाली असणारी छिद्रे कदाचित बंद झालेली असू शकतात. त्यामुळे अशा पाणी जास्त धरून ठेवणाऱ्या कुंड्या कोणत्या आहेत ते ओळखा आणि त्यांची खालीची छिद्रे म्हणजेच ड्रेनेज होल काडी टाकून स्वच्छ करा.
३. कुंंड्यांच्या प्लेट काढून टाका
कुंड्यांच्या खाली जर प्लेट ठेवत असाल, तर पावसाळ्यात त्या काढून टाका. कारण या प्लेटमध्ये प्रत्येकवेळी पाऊस पडल्यावर पाणी साचत जाईल. एवढं पाणी कायम झाडांच्या मुळाशी साचून राहणं पावसाळ्यात योग्य नाही. उन्हाळा आणि हिवाळ्यात पुन्हा प्लेट ठेवा.
४. झाडांची स्वच्छता
उन्हाळ्यात अनेक झाडांची पानं सुकून जातात. काही पानं अर्धी सुकतात आणि अर्धी हिरवीच राहतात. अशी पुर्णपणे सुकलेली किंवा अर्धवट सुकलेली पाने काढून टाका. कारण पावसाळ्यात अशा सुकलेल्या पानांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते संपूर्ण झाडभर पसरू शकतं.
५. झाडांची कटींग
एखादा पाऊस पडून गेल्यावर तुम्ही झाडांचं कटींग करू शकता. पण पाऊस येण्याआधीच कटींग करू नका. कटींगही खूप करू नये. साधारण २ ते ४ इंचापर्यंत करावी.
६. झाडांना खत द्या
उन्हाळ्यात झाडांना रासायनिक खत देणं आपण टाळतो. पण पावसाळ्याच्या सुरुवातीला मात्र झाडांना खत मिळणं आवश्यक असतं. पावसाच्या पाण्यात खूप पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे या दिवसांत झाडांची वाढ भराभर होतेच. ही वाढ अजून निरोगी व्हावी आणि पावसाच्या पाण्यात असलेल्या नायट्रोजनचं रुपांतर नायट्रेट्समध्ये व्हावं, यासाठी झाडांना खत देण्याची गरज असते.
७. सकलंट्सची काळजी
सकलंट्सला खूप ऊन आणि खूप पाणी सहन होत नाही. जर तुमचे सकलंट्स थेट पावसात भिजणार असतील तर त्यांची जागा बदला आणि जिथे कमी पाणी लागेल तिथे त्यांना ठेवा. कॅक्टस प्रकारातली झाडंही खूप पाऊस लागेल अशा ठिकाणी ठेवू नयेत.