आपल्या होम गार्डनमध्ये काही रोपं आवर्जून लावलेली असतात. जास्वंद हे त्यातीलच एक. लाल किंवा गुलाबी रंगाच्या जास्वंदाबरोबरच पांढरे, पिवळे किंवा आणखी वेगळ्या रंगाचे जास्वंद सध्या बाजारात मिळतात. यातही गावठी मोठ्या आकाराचे फूल, अगदी लहान आकाराचे फूल, कमी फुलणारे, जास्त फुलणारे असे बरेच प्रकार असतात. ही फुलं डोळ्यांना पाहायलाही अतिशय छान वाटतात. गणपती बाप्पाचे आवडीचे फूल असलेले हे जास्वंद काही कारणांनी हिरमुसते आणि त्याला कीड लागते. एकदा किड लागली की ती पूर्ण जाईपर्यंत काही केल्या रोपाला फुलं येत नाहीत. अशावेळी रोपाची काळजी कशी घ्यायची आणि किड जाण्यासाठी नेमकं काय करायचं हे समजून घेऊया (How To Take Care Of Hibiscus Plant Gardening Tips) ...
१. अशी घ्या जास्वंदाची काळजी
जास्वंदाला एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालावे. काही वेळा पाणी जास्त झाल्यानेही हे रोप खराब होऊ शकते. तसेच हे रोप लावताना यामध्ये ५० टक्के माती आणि ५० टक्के खत, कोकोपीट, वाळू यांचा वापर करावा. हे रोप पूर्णपणे प्रकाशात ठेवाल्यास याला भरपूर फांद्या आणि फुले येण्यास मदत होते. अन्यथा जास्वंद सुकून जाते किंवा किड लागते. नियमित छाटणी केल्यास हे रोप चांगले फुलते.
२. कडूलिंबाचा वापर
कडूलिंबामधे कीडविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग झाडांवरील कीड घालवण्यासाठीही करता येतो. यासाठी कडूलिंबाची भरपूर पानं घ्यावीत, ती मोठ्या भांड्यात पाण्यात भिजवून ठेवावीत. सकाळी हेच पाणी चांगलं उकळून घ्यावं. थंड करुन हे पाणी स्प्रे बॉटलमधे भरुन झाडांवर फवारावं. कीड असेपर्यंत हे करत राहावे, त्याचा कीड जाण्यास फायदा होतो. झाडांवर कीड नसली तरी झाडांचं कीडीपासून संरक्षण होण्यासाठी आठवड्यातून एकदा कडूलिंबाचा काढा फवारावा.
३. किटकनाशकांचा वापर
बाजारात सध्या थोडी सौम्य किंवा उग्र अशी बरीच किटकनाशके उपलब्ध असतात. काही किटकनाशकांमध्ये रासायनिक घटकांचा वापर न करता नैसर्गिक घटकांचा वापर केलेला असतो. अशी किटकनाशके नियमितपणे रोपावर मारल्यास रोपाला लागलेली पांढऱ्या रंगाची किड निघून जाण्यास मदत होते. नर्सरीमध्ये अशाप्रकारची किटकनाशके सहज उपलब्ध होतात त्यांचा आवर्जून वापर करायला हवा.