मोगऱ्याचा दुरून सुगंध आला तरी आपल्याला मनोमन छान वाटतं. आपल्या घरात गुलाब, जास्वंद असतो त्याचप्रमाणे आपण आवर्जून मोगऱ्याचे रोप लावतो. यामध्ये साधा मोगरा, डबल मोगरा, बटमोगरा, मदनबाण असे मोगऱ्याचे बरेच प्रकार असतात. वर्षभर जपलेल्या या मोगऱ्याच्या रोपाला उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या दरम्यान साधारण बहर येतो. पण हा बहर आला नाही तर मात्र आपली घालमेल सुरू होते आणि आपल्या रोपाला फुलं का येत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडतो. मग आपण कधी एखादं खत घालून बघतो तर कधी या रोपाची छाटणी करुन पाहतो. मात्र त्याचाही विशेष उपयोग होतो असे नाही. अशावेळी नेमकं काय करायचं आपल्याला कळत नाही. मोगऱ्याला भरपूर फुलं यावीत यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय पाहूयात (How To Take Care Of Mogra Plant In Terrace Garden) ...
१. मीठ
मोगऱ्याच्या रोपात मातीमध्ये मीठ घालायचे. यामुळे रोपामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि त्यामुळे झाडाला चांगले पोषण मिळण्यास मदत होते. हे मीठ सगळीकडे पसरुन ठेवावे आणि मातीत ते एकजीव होईल असे पाहावे. त्यानंतर पाणी घालावे म्हणजे रोपाला याचा चांगला फायदा मिळण्यास मदत होते.
२. कॅल्शियम
आपल्याला ज्याप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते त्याचप्रमाणे रोपांनाही कॅल्शियमची आवश्यकता असते. नैसर्गिकरित्या रोपांना हा कॅल्शियम मिळत नसेल तर आपण ज्याप्रमाणे कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन ही कमी भरुन काढतो. त्याचप्रमाणे रोपालाही कॅल्शियमच्या गोळ्या द्याव्यात. त्यामुळे रोपाचे पोषण होऊन त्याला भरपूर कळ्या आणि फुले येण्यास मदत होते.
३. खत टाकण्याची योग्य पद्धत
मोगऱ्याच्या कुंडीत थोडं शेणखत टाका. त्यावर थोडं गांडूळ खत टाका. सगळ्यात वर माती आणि वाळू यांचं मिश्रण टाका. माती आणि वाळू हे दोन्हीही सम प्रमाणात घ्या. यानंतर आता रोपट्याला व्यवस्थित पाणी द्या. अशा पद्धतीने आपल्या मोगऱ्याच्या रोपट्याची आपण मशागत करून ठेवली आहे. अशी मशागत हंगाम सुरू होण्याच्या साधारण महिनाभर आधी करून ठेवली की ऐन हंगामात फुलांचा चांगलाच बहर येतो.