घराच्या परसबागेत झाडी लावणे ही गोष्ट जागेमुळे मागे पडली. तरी मोठमोठ्या इमारतींच्या फ्लॅट सिस्टीममध्ये घराच्या बाल्कनीत, टेरेसवर किंवा अगदी खिडकीतच्या ग्रीलमध्ये रोपं लावली जातात. इतकंच नाही तर जागा नसेल तर दाराच्या बाहेर किंवा घरातही रोपं लावली जातात. यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच पण रोजच्या धकाधकीतून रोपांकडे पाहिल्यावर जरा बरे वाटते. विशेषतः पावसाळ्यात रोपांना चांगला बहर येतो, पण थंडीत मात्र यावर कीड पडणे, रोपं जळून किंवा सुकून जाण्याचे प्रमाण बर्याचदा बघायला मिळते. पण असं होऊ नये आणि आपली घरातली छोटीशी बाग चांगली बहरावी यासाठी घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत (How to take care of plants to grow in Winter).
१. गुलाबाचे रोप - गुलाबाचे रोप लावणार असाल तर एका बटाट्यात ते रोप रोवून बटाट्यासह मातीत लावावे. त्या फांदीला आलेली फुलं व पानं कापून टाकावी. त्या रोपला नियमित खत पाणी घालावे. थोड्याच दिवसात त्याला छान नवी पालवी फुटून रोप चांगले बहरेल.
२. इनडोअर रोपं - इंडोअर रोपांना छान फुलवण्यासाठी एक साधी प्लास्टिकची बाटली घ्या. तिला थोड्या थोड्या अंतराने रोपाचे पाणी घालता येईल एवढ्या आकाराची छिद्रे पाडून घ्या. त्यात एक एक पान तोडून देठाच्या बाजूने छिद्रात घाला. नंतर त्या बाटलीत पाणी भरा, थोड्याच दिवसात तुम्हाला त्या पानांना कोंब फुटलेले दिसतील. मग ते प्रत्येक पान मातीत लावली तर नवीन रोपं उगवू शकतात.
३. बाहेर गावी जाताना – बर्याचदा आपण एक, दोन आठवडे घरी नसलो की आपली छान फुलवलेली बाग पाण्याशिवाय पूर्ण जळून किंवा कोमेजून जाते. त्यावेळी आपण नसतानाही झाडांना पाणी मिळावे म्हणून एका मोठ्या बाटलीत पाणी भरून ती उंच जागी ठेवावी. त्या खाली सर्व रोपांच्या कुंड्या ठेवाव्या. त्या बाटलीच्या तळाशी पोहचेल एवढी लांब दोरी घेऊन तिचे एक टोक बाटलीत तर दुसरे रोपाच्या मुळाशी ठेवावे. त्या बाटलीतून अशी दोरी प्रत्येक रोपात सोडावी. यामुळे रोज थोडे थोडे पाणी रोपांना मिळत राहील आणि ते जळणार नाही.
४. गळालेल्या केसांचा गुंता – बर्याचदा आपल्याला गळालेल्या केसांचा गुंता बघितला की किळस येते. विशेषतः झाडात वगैरे अडकले तर घाण वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की, हाच केसांचा गुंता तुमच्या कोमेजलेल्या रोपला नवे जीवन देऊ शकतो.रोप कोमेजले असेल तर त्या रोपाच्या मातीत केसांचा छोटासा गुंता पुरावा.केसांमधील नायट्रोजन ते रोप शोषून घेते आणि त्यामुळे रोपं पुन्हा बहरतात.
५. रोपांवरची कीड – जर रोपावर कीड पडली असेल तर एक अगदी सोपा उपाय करावा, शिस पेन्सिलला टोक केल्यावर निघलेली टरफले त्यात टाकावीत, कीड आपोआप कमी होते.
६.फुलदाणी – फुलदाणीतली फुलं जास्त काळ ताजी ठेवायची असतील तर त्यात संत्र्याचा रस, थोडसं मीठ, थोडी साखर घातलेले पाणी घालावे.
७. तांदळाचे पाणी – तांदूळ भिजत घालून वरच्या पाण्याचे बर्फाचे खडे बनवावे. तो बर्फ फुलझाडात घातल्याने त्याला चांगले पोषण मिळते आणि भरपूर फुलं येतात.
८. उकडलेल्या अंड्याचे पाणी – आपण अंडी उकडतो, त्याचे उलेले पाणी गार करून रोपांना घातले तर त्यातूनही झाडांना चांगले पोषण मिळते.