रोज डेला गुलाब देता, लालचुटूक गुलाब, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठीही गुलाबाचा बुके दिला जातो. थेट व्हॅलेण्टाइन्स डेपर्यंत गुलाबाचं महत्त्व मोठं. पण कधी असा विचार केलाय की, छान डवरलेली गुलाबाची कुंडीच गिफ्ट दिली तर? किंवा गुलाबाचं रोपच दिलं तर. एक गुलाब तर सुकून जाऊच शकतो, पण गुलाबाचं रोप रोज वाढेल तसं आपलं प्रेमही वाढेल..
बाल्कनीत, अंगणात अगदी मोजक्या ४- ५ कुंड्या असल्या तरी त्यापैकी एक कुंडी असते गुलाबाची. गुलाबाची गुलाबी गोष्ट बरंच काही सांगते, न बोलता. त्यात आपल्या रोपाला फुलं आल्यावर होणारा आनंद तर अवर्णनीय. म्हणूनच तर हा आनंद आपल्याला कायम मिळावा आणि आपल्या अंगणातला गुलाब कायम फुललेला रहावा, यासाठी त्याला वेळेवर खत- पाणी आणि ऊन देणं गरजेचं आहे, हे तर आपण जाणतोच. जे प्रेमाचं तेच गुलाबाचं. गुलाब दिसतात, काटे दिसत नाहीत. तेच प्रेमाचं गुलाबी रोमान्स दिसतो पण नातं जपावं, टिकावं म्हणून अनेका काट्यांकडे दुर्लक्ष करत प्रेमावर भरवसा ठेवावाच लागतो. कधी योग्य छाटणीही करावीच लागते.
या व्हॅलेण्टाइन्स वीकमध्ये जर गुलाब, गुलाबाचं रोप देणार असाल भेट तर गुलाब फुलावा म्हणून छाटणीचं सूत्रही लक्षात ठेवा. गुलाबाच्या काळजीचा आणि प्रेमाचा काय संबंध असा प्रश्न पडला असेल तर एक लक्षातच ठेवायला हवं की नुसतं फुल देऊन प्रेम बहरत नाही, त्यासाठी योग्य खतपाणी आणि छाटणीही आवश्यक असते.
या व्हॅलेण्टाइन्स वीकमध्ये प्रेमाची ही खास गोष्टही समजून घेऊ. गुलाबाच्या झाडाचीच काळजी घेऊ..
१. भारतीय हवामानानुसार गुलाबाची छाटणी करण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. हिवाळा संपण्याच्या आधी किंवा वसंत ऋतुच्या सुरुवातीच्या काळात जर गुलाबाच्या रोपट्याची योग्य पद्धतीने छाटणी करावी.
२. डिसेंबर ते फ्रेब्रुवारी यादरम्यान गुलाबाची छाटणी केल्यास उन्हाळ्यातही गुलाबाचं रोपट अगदी टवटवीत आणि फुलांनी डवरलेलं दिसतं..
३. Royal Horticultural Society (RHS) यांनी केलेल्या अभ्यासानुसार जेव्हा गुलाबाच्या रोपट्याची वाढ मंदावलेली असते, त्याच काळात जर रोपट्याची योग्य पद्धतीने छाटणी केली तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. कापून छान आकार दिलेलं गुलाबाचं ठेंगणं, सदाबहार झाड तुमच्या गार्डनचा संपूर्ण लूकच बदलून टाकणारं ठरतं.
गुलाबाच्या झाडाची छाटणी करण्याची योग्य पद्धत
१. गुलाबाच्या फुलांचा दर्जा राखण्यासाठी गुलाबाच्या झाडाची वेळोवेळी छाटणी करणे गरजेचे असते.
२. गुलाबाची छाटणी करण्याचे दोन- तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या छाटणीत गुलाबाला फुल आल्यानंतर ते जेव्हा सुकते आणि गळून पडते, त्यानंतर त्या फुलाच्या देठाखालचा एक ते दोन इंचाचा भाग कापून टाकला जातो. अशा पद्धतीने छाटणी करताना गुलाबाचा त्या फांदीवरचा डोळा तर कापला जात नाही ना, याची काळजी घ्यावी.
३. चांगल्या डोळ्यांवर सुमारे ५ से. मी. अंतर ठेवून ४५ अंशाचा कोन करून फक्त एकाच कापात छाटणी करावी. यासाठी वापरण्यात येणारी कात्री धारदार असावी.
४. दुसऱ्या प्रकारच्या थेट छाटणी पद्धतीत गुलाबाच्या झाडाच्या ६० सेमी उंचीनंतरचा भाग कापला जातो. जेव्हा वारंवार अशा पद्धतीने कापणी कराल तेव्हा आधी कापलेल्या उंचीपेक्षा १५ सेमी अंतर सोडा आणि त्यानंतर काप द्या.
५. छाटणी केल्यानंतर काही फांद्यांच्या टोकांवर कीड पडण्याची शक्यता असते. १५- २० दिवसांनंतर काही फांद्या वाळलेल्याही दिसतात. अशा वाळलेल्या फांद्या लगेच काढून टाकाव्यात. अन्यथा त्या फांद्यांमधली किड इतर ठिकाणी पसरू शकते.
६. त्यामुळे छाटणी केल्यानंतर कापलेल्या भागावर बोर्डोपेस्टचा थर लावावा.