आयुर्वेदीक आणि धार्मिक महत्त्व असलेली ही तुळस न चुकता घराघरांत लावली जाते. तुळस अगदी सहज येत असल्याने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र एकाएकी ही तुळस वाळायला लागते. एकदा तुळस वाळायला लागली की तिला पुन्हा बहर यायला वेळ लागतो. या रोपाच्या फांद्या आणि पाने ऊन्हाने किंवा अन्य काही कारणांनी सुकून गेल्यावर ती पहिल्यासारखी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते. मग एक तुळस वाळली की आपण बाजारातून दुसरी आणून लावतो पण तिही वाळून जाते. असे वारंवार होत असेल तर आपले काहीतरी चुकत आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. तुळस वाळू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी यााविषयी (How to Take Care of Tulsi Basil Plant at Home)...
१. पाणी घालण्याविषयी..
अनेकदा घाई गडबडीत आपण झाडांना पाणी घालणे विसरतो किंवा अगदीच कमी प्रमाणात पाणी घालतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर ती तग धरु शकत नाहीत. आपल्याला ज्याप्रमाणे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे झाडांनाही जास्त पाणी लागते. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही तर तुळस सुकते आणि नंतर मरून जाते.
२. उन्हाचा चटका लागल्याने तुळशीला धार्मिक महत्त्व असल्याने आपण ती पूर्व, पश्चिम या दिशेने ठेवतो. ऊन्हाळ्यात पूर्वेकडून खूप जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश येतो. तुळस नाजूक असल्याने तुळशीला हा सूर्यप्रकाश सहन होत नाही. त्यामुळे तुळस वाळून जाते आणि मरते. यावर उपाय म्हणून तुळशीच्या वर कापडाचे आच्छादन करणे, तुळस थोडी सावलीत ठेवणे हे उपाय करायला हवेत.
३. छाटणीबाबत
गुलाब किंवा इतर रोपांची आपण ज्याप्रमाणे छाटणी करतो. त्याचप्रमाणे तुळशीचीही नियमितपणे छाटणी करायला हवी. रोपांची नियमित योग्य पद्धतीने छाटणी केल्यास त्याला नव्यान कोंब फुटण्यास मदत होते. वेळच्या वेळी छाटणी केली नाही तर त्याची पाने आणि फांद्या सुकून जातात.
४. माती आणि खत
आपण रोपांसाठी कुंडीत माती घालतो आणि त्यात रोपं लावतो. ही माती थोडी लालसर, चिकट अशा वेगवेगळ्या प्रकारची असते. मात्र तुळशीसाठी फक्त मातीचा वापर न करता मातीच्या ३० टक्के रेती किंवा वाळू वापरावी. तसेच प्रमाणापेक्षा जास्त खत घातले तरी तुळस सुकते. त्यामुळे तुळशीला खत घालताना ते योग्य प्रमाणात असेल याची काळजी घ्यावी.