Join us  

थंडीच्या दिवसांत तुळस सुकून गेली? तुळशीला बहर येण्यासाठी करा फक्त ३ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 12:20 PM

How to take care of tulsi plant in winter : तुळस छान डेरेदार फुलावी यासाठी तिची काळजी कशी घ्यायची याविषयी...

आपल्या घरात बाग, छोटसं होम गार्डन नसलं तरी एक झाड आवर्जून असतं ते म्हणजे तुळस. धार्मिक महत्त्व असलेली ही तुळस न चुकता घराघरांत लावली जाते. आपण न चुकता या तुळशीला पाणी घालत राहतो त्यामुळे ती जगते. पण कालांतराने तिची एखादीच फांदी शिल्लक राहते आणि ही तुळस सुकलेली दिसायला लागते.काही वेळा तुळशीला एखादे फंगल इन्फेक्शन होते, काहीवेळी प्रदूषणामुळेही तुळशीचं रोप वाळून जातं. थंडीच्या दिवसांत बरेचदा तुळशीचा बहर कमी होतो. पण हा बहर पुन्हा यावा आणि ती छान हिरवीगार डेरेदार फुलावी यासाठी आपल्याला तिची थोडी काळजी घ्यावी लागते. यासाठी घरच्या घरी करता येतील असे ३ सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय अगदी सोपे असून थंडीच्या दिवसांतही बागेतली तुळस बहरण्यासाठी त्यांचा नक्कीच चांगला उपयोग होतो. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे (How to take care of tulsi plant in winter). 

१. पाणी घालताना...

थंडीच्या दिवसांत तुळशीला नेहमीपेक्षा खूप कमी पाणी द्यायला हवं. जर तुळशीतील माती कोरडी पडली असेल तर ती ओली होईल इतकंच पाणी घालायला हवं. याशिवाय तुळशीची सुकलेली पानं, इतर कचरा असं काही तुळशीच्या कुंडीत असेल तर वेळच्या वेळी ते नीट साफ करायला हवं. या २ गोष्टींची काळजी घेतल्यास तुळशीला चांगला बहर येण्यास मदत होते. 

(Image : Google)

२.  कडूलिंबाचा उपयोग

कडुलिंबामध्ये अतिशय औषधी गुणधर्म असतात. रोपांसाठीही कडुलिंब फायदेशीर ठरतो. त्यामुळे कडुलिंबाचा पाला, काड्या, फळं यांची पावडर करुन ती तुळशीच्या रोपात घालावी.१ चमचा ही पावडर घातल्यास तुळशीला चांगला बहर येण्यास मदत होते. ही पावडर घरी करणे शक्य नसेल तर बाजारातही रेडीमेड मिळते. ती नसेल तर राख घातल्यासही तुळस चांगली बहरते. 

३. सूर्यप्रकाराशाचे प्रमाण

तुळशीला खूप ऊन लागेल अशा ठिकाणी ती ठेवू नये. कारण तुळशीचे रोप अतिशय नाजूक असल्याने त्याला थेट सूर्यप्रकाश लागल्यास ते वाळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुळशीच्या वर थोडी सावली असेल पण सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे रोप ठेवायला हवे. तुळशीच्या मंजिरीही वारंवार काढायला हव्यात म्हणजे रोपाची चांगली वाढ होते.  

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स