झाडं लावणं हे पुढे झाडं जगवणं, वाढवणं यापेक्षा तसं सोपं काम आहे. आपण आपल्या घरातल्या गॅलरीत किंवा अंगणात झाडं लावतो तेव्हा आपण त्या झाडांचे पालक होतो. झाडांचं पालकत्त्व निभावणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. आपण जेव्हा घरीच असतो तेव्हा झाडांची काळजी घेणं सहज शक्य असतं. पण कुठे आठ दहा दिवस गावाला जायचं म्हटलं की आधी प्रश्न झाडांचा पडतो. अनेकजणांची चांगली झालेली बाग केवळ गावाला गेल्यावर झाडांना पाणी मिळत नाही म्हणून सुकून जाते. पुन्हा नव्यानं झाडं आणणं, वाढवणं आणि गावाला गेल्यावर परत झाडं सुकणं हे असंच सुरु राहातं. पण यावर सोपे उपाय गार्डनिंग एक्सपर्ट असलेल्या एनेट मॅथ्यू सांगतात. 37 वर्षीय एनेट यांचं 'ग्रीक्स ऑफ ग्रीन' नावाचं यूट्यूब चॅनेल आहे.
Image: Google
एनेट यांची बागकामाच्या आवडीबाबतची गोष्टही खूप रंजक आहे. पूर्वी एनेट यांना झाडं लावणं, बागकाम करणं याची काही आवड नव्हती. त्यांची आई आणि सासू या दोघींनाही बागकामाची आवड असताना एनेट मात्र या आवडीपासून अलिप्त होत्या. पण एकदा त्या सहकुटुंब मसुरीला एका नातेवाईकाकडे गेल्या. तिथे त्यांनी त्यांची सुंदर बाग बघितली. त्यांनाही आपण घरात झाडं लावावी असं वाटलं. येतानाच त्यांनी सोबत चांगली 40- 50 जाड पानं आणि जाड देठांची छोटी छोटी रोपं आणली. सुरुवातीला काही महिने तर झाडं लावताना आवडलं झाड की आणून लाव घरातल्या बागेत असं त्या करायच्या. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही. त्यामुळे काही झाडं माना टाकतात. मग त्यांनी उपलब्ध सूर्यप्रकाश आणि उपलब्ध जागा याचा विचार करुन झाडं लावायला सुरुवात केली. 2018 पर्यंत झाडांबद्दलचं त्यांचं ज्ञान खूप वाढलं होतं. मग त्यांनी स्वत:चं यूट्यूब चॅनेल काढलं. पण मूल लहान असल्यानं एखाद दुसऱ्या व्हिडीओ पलिकडे त्यांनी फारसं काही टाकलं नाही. पण एकदा त्यांना त्यांच्या एका व्हिडीओवर चांगला प्रतिसाद आल्याचं लक्षात आलं. मग एनेट यांनी ठरवलं की लोकांना झाडांबद्दल माहिती हवी आहे. आपण ती द्यायला हवी. एनेट मग नियमित आपल्या यू ट्यूब् चॅनेलवर झाडांबद्दलची माहिती, टिप्स देऊ लागल्या. आज त्यांच्या यू ट्यूब चॅनेलचे 80,000 सब्स्क्रायबर आहेत.
एनेट यांना झाडांवर प्रेम असलेल्या लोकांची झाडांबद्दलची तळमळ चांगलीच माहीत आहे. बाहेर गावी गेल्यावर आपली झाडं कशी जगतील म्हणून झाडांसाठी जीव तुटणाऱ्या लोकांची चिंता एनेट यांनी सोप्या टिप्स देऊन दूर केली आहे. त्यांनी आपण गावाला गेल्यावर झाडं व्यवस्थित ठेवण्यासाठीच्या , जगवण्यासाठीच्या सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
Image: Google
गावाला गेल्यावर झाडं जगवायची तर..
1. सर्वात आधी एनेट म्हणतात की, आपलं आपल्या झाडांवर खूप प्रेम असेल तर आधी चांगले शेजारी- जवळचे मित्र-मैत्रिणी बनवा. शक्यतो ज्यांना झाडांची आवड आहे ते मित्र मैत्रिण असले की त्यांना आपली झाडांविषयीची कळकळ कळते. ते आपल्या दीर्घ अनुपस्थितीत घरी येऊन झाडांना पाणी देऊ शकतात आणि आपली चिंता दूर करु शकतात.
2. घरी येऊन कोणी पाणी देणार असेल तर त्यांचं कामही थोडं सोपं करायला हवं. ज्या झाडांना रोज पाणी द्यावं लागतं ती झाडं एका बाजूला आणि ज्यांना 4-5 दिवसातून एकदाच पाणी लागतं त्या झाडांच्या कुंड्या एका बाजूला ठेवाव्यात. रोज पाणी द्यायचं, चार पाच दिवसांनी पाणी द्यायचं .. असे लिहिलेले कागद कुंडीवर चिकटवून ठेवावेत. या वर्गीकरणामुळे घरी जे कोणी येऊन झाडांना पाणी देणार आहेत त्यांचं काम सोपं होईल. कुठल्या झाडांना जास्त पाण्याची गरज आहे, हे त्यांना लक्षात येईल. त्यामुळे कोणाला कमी आणि कोणाला जास्त पाणी मिळून झाडं मरण्याचा प्रश्न येणार नाही.
3. झाडांना पाणी देण्यासाठीची सामग्री सहज नजरेस पडेल अशी ठेवावी. त्यामुळे कमीत कमी वेळात त्यांना झाडांना पाणी देण्याची जबाबदारी पार पाडता येईल.
Image: Google
4. बाहेरुन कोणी येऊन पाणी देणारं नसेल तर आपणच तशी व्यवस्था करायला हवी असं एनेट म्हणतात. एनेट यासाठीच्या टिप्सही देतात. सर्वात आधी ज्या झाडांना कमी सूर्यप्रकाशाची गरज असते किंवा ज्यांना जास्त प्रखर ऊन सहन होत नाही ती झाडं सावलीच्या जागेत ठेवावी. म्हणजे या झाडांच्या मातीतला ओलावा टिकून राहातो.
5. बाहेरगावी जाण्याआधी झाडांना भरपूर पाणी द्यावं. आणि गावाला जाण्याच्या चार पाच दिवस आधीच ऊन सहन न होणारी झाडं सावलीत ठेवावी. म्हणजे या झाडांची माती दीर्घकाळ ओलसर राहाते.
6. ज्या झाडांना नियमित पाण्याची गरज आहे, काही दिवस पाणी दिलं नाही की ती सुकतात अशा झाडांना पाण्याची सलाईन लावावी. यासाठी पाण्याच्या प्लॅस्टिक बाटलीला सूईनं दोन चार छोटी छिद्रं पाडवीत. हे बाटली पाण्यानं भरुन झाकण लावून झाडाच्या मुळाशी उपडी करुन ठेवावी. बाटलीच्या छिद्रातून थेंब थेंब पाणी गळत ठिपकत राहातं आणि झाडांची माती ओलसर राहून झाडं तग देऊन राहातात.
7 . आपल्याकडे पसरट टब असेल तर या टबमधे पाणी घालून कुंड्या त्या टबमधे ठेवाव्यात. यामुळे झाडांमधील ओलावा टिकून राहातो. फक्त टबमधील पाण्यात डासांनी अंडी देऊ नये यासाठी एक कप पाणी घेऊन त्यात 3 टक्के हायड्रोजन पेराॅक्साईड आणि तीन थेंब भांडी घासण्याचं लिक्विड घालून हे द्रावण चांगलं मिसळून् घ्यावं. हे द्रावण स्प्रे बाॅटलमधे भरुन टबच्या पाण्यात आणि झाडांवर मारावं.
Image: Google
8. कुंड्याच्या जवळ एक पाण्याची बादली भरुन ठेवावी. एका लांब सूती कापड घेऊन त्याची गुंडाळी करावी. या गुंडाळीचं एक टोक पाण्यात आणि एक टोक झाडांच्या मुळाशी ठेवावं. हा उपाय केल्यानेही झाडं चांगली 5-6 दिवस जिवंत राहातात.
9. झाडांमधली माती जर ओलावा धरुन ठेवणारी असेल तर काही दिवस झाडांना पाणी नाही मिळालं तरी चालतं. यासाठी कुंड्यातील माती बदलावी. या मातीत नारळाच्या शेंड्या घालाव्यात. ही माती झाडांना दिली तर मातीतल्या या शेंड्या पाणी धरुन ठेवतात.
10. गावाला जायच्या आधी कुंड्यांना भरपूर पाणी द्यावं. आणि कुंडीतल्या झाडांभोवती कोरडा कचरा ठेवावा. यामुळे कचऱ्याच्या आड कुंडीतील माती ओलसर राहाते. झाड पाण्याअभावी मरत नाही.
11. एनेट झाडातला ओलावा टिकवून ठेवणाऱ्या काही सामग्रीबद्दलही सांगतात. या सामग्री ऑनलाइन सहज मिळतात. टायमरची सुविधा असलेलं ड्रिप एरिगेशन सिस्टिम आहे. यात पाणी घालून ठेवलं, टायमर सेट केलं आणि या सिस्टिमच्या सोबत येणाऱ्या ट्यूब झाडांच्या कुंड्यात ठेवल्या की रोज ठराविक वेळेत कुंड्यांना पाणी मिळतं. पण यासाठी थोडा खर्च होतो एवढंच.