मोगरा हे अनेकांच्या आवडीचे फुल. मोगऱ्याचा दुरून सुगंध आला तरी आपल्याला मनोमन छान वाटतं. मोगऱ्याचा गजरा एखाद्या स्त्रीने माळला असेल आणि ती आपल्या आजुबाजुने गेली तरी आपण मोहून जातो. आपल्या घरातील बागेत गुलाब, जास्वंद, झेंडू, सदाफुली ही रोपं असतातच. त्याचप्रमाणे मोगऱ्याचेही एखादे रोप आपण आवर्जून लावतो. यामध्ये साधा मोगरा, डबल मोगरा, बटमोगरा, मदनबाण असे मोगऱ्याचे बरेच प्रकार असतात. मोगऱ्याला कधीकधी भरभरुन फुलं येतात. पण काहीवेळा मोगऱ्याची नुसती पानं दिसतात आणि फुलं येईनाशी होतात. नेहमी बहरलेल्या असणाऱ्या एखाद्या रोपाचा बहर अचानक कमी झाला तर आपली घालमेल सुरू होते. आपल्या रोपाला एकाएकी फुलं का येत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी नेमकं काय करायचं आपल्याला कळत नाही. मोगऱ्याला भरपूर फुलं यावीत यासाठी घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय पाहूयात (Know how to grow maximum flowers on Jasmin) ...
१. छाटणी
साधारणपणे उन्हाळ्याच्या काळात मोगरा फुलण्याचा सिझन असतो. त्यावेळी म्हणजेच फुब्रुवारी महिन्यात मोगऱ्याच्या रोपाची थोडी छाटणी करावी. फांद्या आणि पाने यांची योग्य पद्धतीने छाटणी केल्यास मोगऱ्याला छान बहर येण्यास मदत होते.
२. सूर्यप्रकाश
मोगऱ्याला सूर्यप्रकाशाची इतर रोपांपेक्षा थोडी जास्त आवश्यकता असते. त्यामुळे किमान ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळेल अशाठिकाणी मोगऱ्याचे रोप ठेवावे. यामळे मोगरा मस्त फुलतो.
३. पाण्याचे प्रमाण
मोगऱ्याच्या रोपाला पाणीही जास्त प्रमाणात लागते. विशेषत: हे रोप जेव्हा फुलत असते तेव्हा त्याला तेव्हा त्याची माती ओलसर असायला हवी. उन्हाळ्यात कुंडीतील माती तापमान जास्त असल्याने पटकन कोरडी होते. त्यामुळे शक्यतो मोगऱ्याला २ वेळा पाणी घालावे जेणेकरुन मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
४. खतं
मोगऱ्याला खत देताना विचारपूर्वक द्यावी लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नायट्रोनयुक्त खत असल्यास ते पानांच्या वाढीसाठी फायदेशीर असते पण फुलांसाठी ते तितके उपयुक्त नसल्याने फुलं येण्यास या खतांचा उपयोग होत नाही. त्यापेक्षा मोगऱ्याच्या रोपाला फॉस्फरसयुक्त खतं दिल्यास फुलांची चांगली वाढ होण्यास मदत होते. यात अंड्याच्या सालांची पावडर, केळीच्या सालांची पावडर, लाकडाची राख अशा गोष्टींचा उपयोग होतो.