आपले हे होम गार्डन कधी गॅलरीत, कधी छोट्याशा टेरेसमध्ये तर कधी दारात नाहीतर खिडकीच्या ग्रीलमध्ये असते. या होम गार्डनमध्ये तुळस, मोगरा यांच्याबरोबरीनेच गुलाबाचं एक तरी रोप असतंच. यामध्ये गावठी गुलाब, बटण गुलाब, चिनी गुलाब असे बरेच प्रकार असतात. नवीन आणल्यावर या रोपाला मस्त भरपूर फुलं येतात. पण एकाएकी गुलाबाला फुलं येणंच बंद होतं. यामागे बरीच कारणे असू शकतात. पण गुलाब फुललेला असला तर मस्त वाटते. रोजच्या धावपळीत आणि ताणात झाडाचे एखादे फूल पाहून आपण मनोमन खूश होतो. मात्र बरेच दिवस रोपाला फुलं येत नसतील तर त्याचे कारण शोधून काढणे आणि त्यावर काही ना काही उपाय करणे आवश्यक असते. पाहूयात गुलाबाला पुन्हा आधीसारखा बहर येण्यासाठी नेमके कोणते उपाय करायचे (Know How To Take Care Of Rose Plant for getting Flowers gardening Tips)...
१. कटींग करा
गुलाबाला एकदा फुलं येऊन गेली की साधारणपणे त्याच फांदीला किंवा त्याठिकाणी लगेच फुलं येत नाहीत. दुसऱ्या ठिकाणी नवीन पालवी फुटते आणि मग फुलं येतात. अशावेळी फुलं येऊन गेलेली फांदी छाटणे गरजेचे असते. कारण मातीतून मिळणारे पोषण आवश्यक नसलेल्या फांदीला, पानांना जात असेल तर त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे वेळच्या वेळी गुलाबाचे कटींग केल्यास त्याची पालवी फुटायला आणि त्याठिकाणी फुलं येण्यास मदत होते. तसेच हे कटींग नेमके कुठून, कशा पद्धतीने करायचे याचीही काही पद्धत असते ती पद्धत फॉलो करुन मगच कटींग करायला हवे.
२. कुंड्या साफ करा
कुंड्या गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रीलमध्ये बाजूबाजूला असतील तर त्यामध्ये अनेकदा त्याच रोपाची किंवा आजुबाजूच्या रोपांची पाने, काड्या पडतात. काहीवेळा पक्ष्यांची विष्ठाही यामध्ये पडते. आजुबाजूचा इतर कचराही या रोपांमध्ये वरच्या बाजूला साचून राहतो. आपण झाडांना पाणी घालतो पण हा कचरा वर तसाच राहतो. त्यामुळे झाडांना ऑक्सिजन मिळण्यास किंवा पुरेसे पोषण मिळण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुंड्यामधील कचरा आणि घाण वेळच्या वेळी आवर्जून साफ करायला हवा.
३. नुसते पाणी घालून उपयोग नाही
आपण झाडाला नेहमीसारखे कुंडीत पाणी घालतो. पण त्याची पाने आणि फांद्या कोरड्या पडल्यासारखी झाली असतील तर स्प्रेचा वापर करुन पाणी घालायला हवेत. तसेच झाडांशी थोड्या गप्पा मारुन त्यांच्यावर प्रेम केले तर नकळत त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचतात आणि ती फुलण्यास मदत होते.
४. रोपांकडे बारकाईने पाहायला हवे
घाईगडबडीत आपण झाडांना पाणी देण्याचे काम करतो. पण त्यांच्याकडे बारकाईने पाहण्यासाठी आपल्याला वेळ होतोच असे नाही. मात्र बारकाईने पाहून त्यावर एखादी किंड लागली असेल तर वेळीच औषध फवारणी करायला हवी. काही वेळा रोपात मुंग्या, इतर किटक असतील तरीही झाडाची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. अशावेळी योग्य ती माहिती घेऊन झाड़ावर किटकनाशके फवारायला हवीत. म्हणजे किड निघून जाऊन फुले येण्यास मदत होईल.