अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
पावसाळ्यात हिरवळ दाटे चोहिकडे जरी असली तरी हिरव्या भाज्यांचा मात्र तुटवडाच असतो. रानातल्या पालेभाज्या, कुर्डू,फोडोशी,कोरल, भरांगी या दिवसात खूप मिळतात पण आपल्याला जर मेथी,पालक, कोथिंबीर हवी असेल तर मग अवघड होतं. त्याचं कारण असं की या पालेभाज्या नाजूक असल्यामुळे अती पाणी सहन करू शकत नाहीत. शेतात पाणी जरा जास्त झालं की सगळी भाजी संपलीच! पण आपण आपल्या लहानशा सुरक्षित बागेत या भाज्या हमखास लावू शकतो. ते कसं, बघूया..
पालेभाज्या कशा लावायच्या?पाले भाज्यांचा कार्यक्रम अगदी झटपट होतो. अवघ्या ३० दिवसात आपलं शेत काढणी साठी तयार होतं. त्यासाठी खूप खोल कुंड्या न घेता पसरट कुंड्या घ्याव्या. नेहेमीप्रमाणे कुंडीला खाली मोठं छिद्र असावं. त्यात चांगलं कुजलेलं शेणखत आणि माती घालावी. उपलब्ध जागेप्रमाणे एकाच प्रकारची किंवा वेगवेगळ्या भाज्या लावता येतील.
बिया?आपल्या घरी मेथी, मोहोरी, धणे, बाळंत शेपा असतातच. ते बियाणे म्हणून वापरता येतील. पालक, आंबट चुका,अंबाडी,माठ लावायचे असतील तर बिया विकत घेता येतील.काही प्रक्रिया करावी लागते का?बिया जरा भिजवून पेरल्या की लवकर रुजतात. आठ तासांपेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाही. धणे जरासे चिरडून पेरावे लागतात. लाटणं हलकंसं फिरवलं तरी चालतं. कुटायचे नाहीत.