अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
बाग काम करण्याची लाख हौस असली तरी शहरांमध्ये खूप अडचणी असतात, मर्यादा असतात. एक तर धकाधकीचं आयुष वेळ नसतो. आणि वेळात वेळ काढला तरी जागा कमी पडते. जागा असली तरी त्यात सूर्य प्रकाश कमी पडतो. कमी सूर्य प्रकाश आहे, घरात -बाल्कनीत ऊनच येत नाही. या प्रश्नाला तर काही उत्तर नाही. कारण बागेला ऊन तर हवंच. मग करायचं काय?आपल्याला शाळेत शिकवले आहे की वनस्पती कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाशात प्रकाश संसलेशन करून स्वतःच अन्न तयार करतात.सगळ्या वनस्पतींना सूर्यप्रकाशाची कमी जास्त प्रमाणात गरज असते.आपल्या घरात किंवा बागेतली झाडं छान वाढावी. त्यांना भरपूर फुलं यावी अशी आपली इच्छा असते. त्यासाठी एक छोटीशी कृती करावी. आपण जिथे झाडं लावणार आहोत त्या ठिकाणची दिशा बघावी. त्या ठिकाणी कधी आणि किती प्रमाणात सूर्यप्रकाश येतो त्याचे निरीक्षण करावे. असं केल्यास आपल्या लक्षात येईल की उत्तर दिशेकडे जरी उजेड असला तरी प्रत्यक्ष ऊन येतच नाही. पुर्वेकडे सकाळचं कोवळ ऊन येतं. पश्चिम आणि दक्षिणेला भरपूर ऊन असतं. पण शेजारी उंच इमारत किंवा मोठं वृक्ष असेल तर मग उन्हाचं कठीणच असतं.उदाहरण घ्यायचं झालं तर गुलाबाच्या झाडाला उत्तम प्रकारची भरपूर फुलं यायला कमीत कमी ५ ते ६ तास कडक ऊन लागतं. ऊन कमी मिळाल्याने झाडाच्या वाढीत फरक दिसतो. फांद्या लांब होतात, पानं मोठी होतात, फुलांची संख्या कमी होते. त्यांना कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्याउलट कमी सूर्य प्रकाश किंवा सावली आवडणारी जी झाडं असतात ती उन्हात ठेवली की त्यांची वाढ खुंटते, पानं,फांद्या करपतात.बहुतांश फुलं, फळं,भाज्यांना भरपूर सूर्य प्रकाशाची गरज असते.
पण मग ज्यांच्याकडे सूर्यप्रकाश येत नाही त्यांनी काय करावे?१. त्यांनी शेड लव्हिंग प्लाण्ट्स म्हणजे ज्या झाडांना सावली प्रिय आहे अशी झाडं निवडावी. त्यात बरेच खाद्य,भाज्यांचे आणि सुंदर शोभेची झाडं आहेत .२. नेहेमी प्रमाणे कुंड्या भराव्या, रोपं लावावी. पण एक गोष्ट लक्ष्यात ठेवा की सावलीतल्या झाडांना रोज रोज पाणी घालू नये. बाष्पीभवन कमी होत असल्यामुळे माती जास्त वेळ ओली राहते. गरोप्रमाणे पाणी घालावे.३. अळू, भाजीचा आणि वड्यांचा सावलीत छान फोफावतो. पानं मोठी आणि लुसलुशीत होतात. बाजारात अळकुड्या म्हणजे अळूचे कंद विकत मिळतात .ते लावता येतील. शक्यतो खात्रीच्या ठिकाणाहून रोपं आणावे कारण ते खूपच खाजरे असू शकतं.४.. मायाळूचा वेल सावलीत वाढतो. एखाद्या खिडकीत चढवला तरी दर आठवड्याला त्याचे शेंडे आणि पानं खुडता येतात. ही भाजी जराशी चिकट होते पण चव चांगली असते. सारक असल्यामुळे पोटासाठी पण उत्तम. मुलांना तर त्याची फळं भारीच आवडतात कारण ती दाबली की गडद गुलाबी रंगाची शाई निघते!५. दक्षिणेत लोकप्रिय पण आपल्यासाठी एक नवीन भाजी म्हणजे कढीपत्ता सारखी पानं असलेली मल्टी व्हिटामिन प्लाण्ट नावाने ओळखली जाणारी बहुवर्षीय झुडूप. याचे शेंडे कोवळी पानं आमटीत, भाजीत, पराठ्यात घालता येतात. जेवढी खुडू तेवढी जास्त वाढते. एखादी फांदी खोचली तरी ती रुजते.६. कढी लिंबाचे झाड सावलीत छान वाढतंच. आपल्या घरचा कढीपत्ता जेवणाची लज्जत आणखीनच वाढवतो.७. कमी सूर्य प्रकाशाच्या जागेत मघई किंवा बनारसी पानाचा वेल चढवू शकाल, जेवण झालं की अगदी ताजं खुडून आणलेल कुरकुरीत करकरीत मिठा पान!