अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
पावसाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहे. बागकाम प्रेमी आणि बागकाम करू इच्छित असलेले लोक किंचित जास्त. बागकाम सुरू करण्याचा उत्साह याच ऋतूत सर्वात जोरात असतो. नवीन झाडं लावायची लगबग, जुन्या झाडांची माशागत, एवढेच नव्हे तर आहेत त्या रोपांपासून नवीन रोप बनवणे. या सर्व कामात गुंतून जातात. पण खरं सांगायचं तर यशस्वी बागकमाची गुरुकिल्ली मात्र जमीन तयार करण्यात आहे.हल्ली जागेअभावी बागकाम करायला बहुतांश लोकांकडे कुंड्या हाच पर्याय राहिला आहे. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने कुंडी भरली तर या सर्व बागकमाच्या उपक्रमाचं चीज होईल. अन्यथा मेहनत फुकटही जाऊ शकते. कुंडी भरण्याची शास्त्रोक्त पद्धत म्हणजे काय?
१. पहिली गोष्ट म्हणजे झाड लावायला लागणारं एक पात्र, ती कुंडी असेल किंवा रिकामा डबा, किंवा बादली असलेल्या जागेत जे मावेल ते. शक्यतो त्याचे तोंड मोठे असावे म्हणजे माती उकरायला काही अडचण होणार नाही. २. मग कुंडीला खाली आपली करंगळी आत जाऊ शकेल इतपत मोठं छिद्र असावं. असायलाच हवं. ह्याला पर्याय नाही. ह्यातूनच जास्तीच पाणी वाहून जाईल, नाही तर पाणी साचून झाडाची मूळ कुजु शकतील.३. आता या छिद्राला झाकायला एक तुटलेल्या विटांचा, किंवा तुटलेल्या माठाचा किंवा लिंबाएवढ्या मोठ्या दगडांचा थर घालावा.
४. थरावर आपल्या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला पाला पाचोळा घालायचा. किमान चार ते पाच इंचाचा थर, कुंडी मोठी असेल तर जास्त मोठा उत्तम. हा पाला पाचोळा कालांतराने कुजतो आणि भुसभुशीत होतो. त्यात मुळं उत्तम वाढतात .५. शेवटचा आणि महत्त्वाचा थर म्हणजे खत, माती त्याचबरोबर मातीचा कस वाढवणारे इतर घटक.६. आता प्रत्येक ठिकाणची माती वेगळी असते,तिचा रंग वेगळा,पोत वेगळा. काही ठिकाणची काळी चिकट, काही ठिकाणची लाल मुरमाळ, तर काही ठिकाणी वाळुकामय. काही मातीत पाण्याने चिखल होतो तर काही मातीत पाणी थांबत नाही.तर या सर्व प्रकारच्या मातीत आपल्याला गरजे प्रमाणे सेंद्रिय खत घालावे लागते.
७. उत्तम कुजलेलं सेंद्रिय खत मातीचा पोत सुधारण्यासाठी तर चांगलं असतंच त्या शिवाय मातीची सुपीकता ही वाढवतं. त्याहूनही महत्त्वाचे वापसा चांगला होतो, म्हणजे मातीत पाणी आणि हवेचे प्रमाण मेंटेन करतं.८. झाडांच्या वाढीसाठी मुळाना जशी पाण्याची गरज असते तशीच त्यांना हवेची गरज असते. म्हणून माती भुसभुशीत असायला हवी. ९. घरी ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले खत सर्वोत्तम. ते नसल्यास मग चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत चांगले. गरजे प्रमाणे एक भाग माती एक भाग खत घ्यावे. त्यात कडुलिंब पेंड घातली तर जमिनीत क्षार तर मिळतातच शिवाय किडा मुंगीचा त्रास कमी होईल.१०. बोनमील, फिशमील सारखे सेंद्रिय पदार्थ घातल्यास ते हळू हळू पोषक द्रव्य मातीत मुरतात. अशाप्रकारे कुंडी भरल्यास झाडांची वाढ चांगली होते,त्यांचे आरोग्यही उत्तम राहते, भरपूर फुलं येतात.
अंजना देवस्थळे संपर्क