Join us  

रोपांसाठी महागडी खतं विकत आणता? किचनमधले ४ मसाल्याचे पदार्थ वापरा, बाग बहरेल हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2023 1:44 PM

Natural Pesticides from kitchen for home garden : रासायनिक खतं वापरण्यापेक्षा घरातील मसाल्याचे पदार्थ खतं म्हणून अतिशय उत्तम काम करतात.

आपल्या होम गार्डनमधील रोपं छान बहरलेली आणि हिरवीगार असावीत अशी आपली इच्छा असते. त्यासाठी आपण या रोपांची विशेष काळजी घेत असतो. घरात जितकी जागा उपलब्ध असेल त्यात आपण हे गार्डन फुलवतो. या रोपांची विशेष काळजी घ्यायला आपल्याला रोजच्या धावपळीत जमतेच असं नाही. पण या रोपांना न चुकता पाणी घालणे, विकेंडला त्यांची कापणी करणे आणि मधेआधे या रोपांना खत घालणे किंवा किटकनाशके फवारणे या किमान गोष्टी आपण करतो Natural Pesticides from kitchen for home garden 

 नर्सरीमधून आपण ही किटकनाशकं आणि खतं विकत आणतो खरी पण त्यामध्ये नेमकं काय घातलेलं असतं याचा आपल्याला अंदाज नसतो. इतकंच नाही तर ही खतं बरीच महागही असतात. त्यामुळे अशी रासायनिक खतं वापरण्यापेक्षा घरातील मसाल्याचे पदार्थ खतं म्हणून अतिशय उत्तम काम करतात. हे पदार्थ कोणते आणि ते कसे वापरायचे याविषयी समजून घेऊया...

१. हळद 

हळद अँटीबॅक्टेरीयल असल्याने आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्याचप्रमाणे रोपांसाठीही हळद उपयुक्त ठरते. रोपांवर किड लागू नये यासाठी हळदीचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच रोपांची चांगली वाढ व्हावी आणि मातीचा कसदारपणा वाढावा यासाठी हळद उपयुक्त असते. यासाठी मातीत काही दिवसांनी हळद घालावी तसेच रोपांवर हळदीच्या पाण्याची फवारणी करावी. 

(Image : Google)

२. लसूण 

लसणामध्ये अमोनिया आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. हे दोन्ही घटक रोपांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी फायदेशीर असतात. लसणाचा वास उग्र असल्याने मुंग्या, अळ्या रोपांपासून दूर राहतात. तसेच लसणाची सालंही रोपांसाठी उत्तम खत म्हणून काम करतात. लसणाची सालं पाण्यात भिजवून ठेवली आणि हे पाणी रोपांना दिले तर किटकनाशक म्हणून त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

३. चहा

चहा केल्यानंतर गाळलेला चोथा आपण फेकून देतो. पण हा चोथा रोपांसाठी अतिशय फायदेशीर असून हा चोथा पाण्याने एकदा धुवून घ्यावा आणि खतासारखा रोपांमध्ये घालावा. यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण चांगले असल्याने महिन्यातून १ ते २ वेळा खत म्हणून याचा वापर करावा. 

४. हिंग 

रोपांना कीड लागू नये म्हणून हिंग पाण्यात मिसळून हे पाणी रोपांना घालायला हवे. तसेच स्प्रे बॉटलमध्ये भरुनही रोपांवर आपण किटकनाशकाप्रमाणे हे पाणी फवारु शकतो. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स