Join us  

Plant Care In Summer: उन्हाळ्यात कुंडीतील माती ओलसर ठेवण्यासाठी ३ उपाय... कमी पाण्यातही झाडे जगतील छान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2022 5:10 PM

Gardening Tips: उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भेडसावते... अशा भागातील झाडांची, रोपट्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबतचे हे ३ उपाय...

ठळक मुद्देकमी पाण्यातही कुंडीतली माती ओलसर ठेवून झाडं जपायची असतील तर हे काही सोपे उपाय करून बघा..

अंगणात, बागेत, टेरेसमध्ये वाढलेल्या झाडांची उन्हाळ्यात काळजी घेणं हे मोठे आव्हान असते. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक भागात तिव्र पाणीटंचाई सुरू होते.. अशा काळात झाडं सांभाळणं हे खरोखरंच अवघड होऊन जातं.. झाडांना दररोज पाणी दिलं तरी उन्हामुळे कुंडीतील माती काही तासांत लगेचच कोरडी पडते. त्यामुळे मग पुरेसं पाणी न मिळाल्याने झाडं कोमेजून जातात, तर काही झाडांची वाढ खुंटते.. म्हणूनच कमी पाण्यातही कुंडीतली माती ओलसर ठेवून झाडं जपायची असतील तर हे काही सोपे उपाय करून बघा.. झाडांवर हिरवा कपडा बांधणे आणि त्यांच्यावर सावली धरणे हा उपाय आहेच, पण त्यासोबतच हे काही सोपे उपायही तुम्ही करू शकता. 

 

१. पालापाचोळ्याचा वापरउन्हाळ्यात अनेक झाडांची पाने गळू लागतात. अशी गळून पडलेली सर्व पाने जमा करा आणि कुंडीतल्या मातीत या पानांचा एक थर व्यवस्थित अंथरून ठेवा. असं केल्यामुळे पानांचा एकप्रकारचा आडोसा मातीवर तयार होईल. कुंडीतल्या मातीवर थेट ऊन पडणार नाही आणि त्यामुळेच मातीतला ओलावा अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल. 

 

२. शोभेच्या दगडांचा वापर (garden stones)गार्डन डेकोरेशन करण्यासाठी अनेक आकर्षक दगडं मिळतात. पांढरे, चॉकलेटी, तपकिरी अशा विविध रंगांचे आणि आकारांचे गार्डन स्टोन्स वापरूनही तुम्ही कुंडीतील माती झाकून टाकू शकता. यामुळेही सुर्यप्रकाश थेट कुंडीतल्या मातीवर पडणार नाही आणि माती लवकर कोरडी होणार नाही.

 

३. घरच्याघरी ठिबक सिंचनशेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धती वापरण्यात येते हे आपल्याला माहिती आहे. हेच काम आता आपल्याला आपल्या गार्डनमध्ये करायचे आहे. यासाठी घरातल्या जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करा. बाटलीच्या झाकणांना छिद्र पाडा. बाटली पाण्याने भरा आणि ती कुंडीमध्ये तिरकी किंवा उलटी ठेवून द्या. बाटलीतलं पाणी थेंब थेंब गळालं पाहिजे, अशा पद्धतीने बाटली ठेवलेली असावी. एकदम पाणी टाकलं की एकदम उडून जातं. पण यापद्धतीने थेंब थेंब पाणी मिळत गेल्यास जमिनीतला ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागपाणीइनडोअर प्लाण्ट्स