Join us  

छोट्या जागेत, अगदी छोट्या कुंडीत घरच्याघरी लावा मेथी-कोथिंबीर! ताजी कोवळी मस्त भाजी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 1:58 PM

सोप्या पद्धतीने घरच्या घरी लावता येतील अशा भाज्या नक्की लावून बघा

ठळक मुद्देशहरात राहूनही आपल्या हाताने पिकवलेल्या भाज्या खायची मजा काही औरचथंडीत गरमागरम पोह्यावर किंवा एखाद्या भाजीवर चिरलेली ताजी हिरवीगार कोथिंबिर असेल तर...

आपल्या घरात अनेक कुंड्या असतात. कधी गॅलरीत, कधी खिडकीच्या ग्रिलमध्ये तर कधी वर लटकणाऱ्या शोभेची झाडं असलेल्या. आता या कुंड्यांमध्ये फुलांची आणि इतर काही रोपं असतात. पण किचनमध्ये उपयोगी पडतील अशा काही सोप्या भाज्यांची लागवड आपण घरच्या घरी केली तर? विशेष म्हणजे शहरात राहूनही आपल्या हाताने पिकवलेल्या भाज्या खायची मजा आपल्याला घेता येईल आणि कुंडीतून तोडलेल्या ताज्या भाज्या सहज उपलब्ध होतील. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला फारसे कष्टही घ्यावे लागणार नाहीत. थंडीत गरमागरम पोह्यावर किंवा एखाद्या भाजीवर चिरलेली ताजी हिरवीगार कोथिंबिर असेल तर खाण्याची लज्जतच वाढेल. तसंच कोवळी मस्त मेथी तोडून त्याची भाजी केली तर, ही मजाच काही और आहे. 

(Image : Google)

कोथिंबिर लावताना... 

१. कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी घरातील धने आपण वापरु शकतो. 

२. बऱ्याच जणांना वाटते धने खूप जाडसर असतात, तसेच त्याला साल असते त्यामुळ ते तसेच टाकले तर कोथिंबिर उगवेल का त्यामुळे अनेक जण त्याचा चुरा किंवा पूड करुन ते कुंडीत घालतात. पण तसे न करता पूर्ण धने लावणे आवश्यक असते. 

३. हे धणे पूर्ण वाळलेले असतात, त्यामुळे तुम्हाला कोथिंबिर लावण्यसाठी हिरवट रंगाचे थोडे ओलसर धने मिळाले तर ते जास्त चांगले. 

४. कोथिंबिर येण्यासाठी बऱ्यापैकी जागा लागत असल्याने थोडी पसरट कुंडी घेतलेली चांगली. बाल्कनी थोडी मोठी असेल तर खाली मातीचा वापा करुन लावल्यास आणखीनच उत्तम 

५. मातीमध्ये धने पेरल्यानंतर त्यावर पुन्हा मातीचा थोडा जाडसर थर द्यावा. 

६. पहिल्या दिवशी या कुंडीला भरपूर पाणी द्यावे आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ही कुंडी ठेवावी. 

७. या धन्याला कोंब फुटण्यासाठी किंवा अंकुर येण्यासाठी ८ ते १० दिवस लागतात. त्यामुळे मधल्या वेळात माती उकरुन पाहणे, सतत त्या कुंडीशी खेळत राहणे असे करु नये. 

८. कोथिंबिर पूर्ण तयार व्हायला साधारण ३५ ते ४० दिवस लागतात. 

९. दोन ते तीन कुंड्यांमध्ये किंवा थोड्या मोठ्या जागेत कोथिंबीर लावल्यास आपल्याला नेहमी ताजी टवटवीत कोथिंबीर वापरायला मिळू. शकेल. 

१०. कोथिंबिरीच्या रोपाला जास्त पाणी घालू नये. योग्य त्या प्रमाणातच पाणी द्यावे. अन्यथा या रोपात चिखल होऊन ते खराब होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

मेथी लावताना...

मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात केला जातो. मेथीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह हे घटक पुरेशा प्रमाणात असतात. मेथी चवीला कडू असली तरी त्यामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. मेथी पाचक असून यकृत व प्लिहा यांची कार्यक्षमता वाढविण्यास मेथीचा उपयोग होतो. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी मेथी आवर्जून खायला हवी. 

१. मेथीचे बी कुंडीत लावल्यास रोप येईल असे आपल्याला वाटते. पण तसे होत नाही. किंवा तसे झाल्यास त्यासाठी खूप वेळ लागू शकतो. 

२. मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात, त्यामुळे हे दाणे हलके होतात. 

३. हे दाणे बाहेर काढून एका प्लास्टीकवर वाळत घालावेत. 

४. अर्धवट वाळल्यानंतर हे दाणे कुंडीत किंवा वाफ्यात पेरावे. मेथी यायला बऱ्यापैकी जागा लागत असल्याने पसरट किंवा उथळ कुंडी घ्यावी.

५. मेथीला साधारणपणे थंड हवामान, योग्य सूर्यप्रकाश आणि हवेतील आर्द्रता आवश्यक असते. महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी अशाप्रकारची हवी असल्याने मेथीचे पीक सहज येते. 

६. मेथीची पूर्ण वाढ होण्यास बऱ्यापैकी वेळ लागत असल्याने घाईने पीक का येत नाही म्हणून निराश होण्याची आवश्यकता नाही. ३५ ते ४० दिवसांत मेथीची पूर्ण वाढ होते. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स