उन्हाळा म्हणजे परीक्षा किंवा सुट्टी. अशीच आठवण असते. पण रसरशीत उन्हाळा आपण कधी अनुभवतो का? आइस्क्रिमचा गारवा, गप्पांची मैफल आणि निवांतपणा. वाळवणं. आजीशी गप्पा. भर उन्हात झणझणीत बेत. आणि निसर्ग त्याच्याकडे तरी कुठं आपलं लक्ष जातं? आपण मान वर करुन बघतच नाही निसर्गातली रंगपचमी.
होळी येता येताच झाडं रंग बदलायला लागतात. मोहोर येतो. नवीन पालवी फुटत असते. कडुनिंबाचे झाडच बघा नां. सदा हिरवेगार, डौलदार गुणी बाळ. पण त्याला "ग्लॅमर" नाही. सुगंधी फुले म्हटले की गुलाब, मोगरा, जाई, जुई अशीच फुले आघाडीवर असतात. कडुनिंबाच्या मोहोराचा गंध अक्षरशः वेडावून टाकणारा असतो. जांभूळ, आंबा, बेलाचे झाड, इतके गंधात माखून निघतात की आपण धुंद व्हावं.
(Image :google)
रस्त्याने आजूबाजूला फुललेले गुलमोहोर बघायला थांबलात कधी? पळस, पांगारा, बहावा, टॅब्युबिया यांची बहार म्हणजे तर का वर्णावा तो माहौल. उन्हाळ्यात विविध फळांची चंगळ असते. रंग चव यांची नुसती रंगपंचमी साजरी होते. निसर्गाला सुद्धा आपल्याला काहीतरी सांगायचे असते. दरवर्षी ठरल्यावेळेत या झाडांना बहर येतो. फुलं फुलतात. फळं येतात. पक्षी नाचतात. सगळा निसर्ग नवा नवा होतो. आणि आपण मात्र ऊन ऊन म्हणत सावली शोधतो. आपल्या वाट्याला कशी येणार मग ही रंगपंचमी?