मार्च महिन्यापासूनच ऊन तापायला सुरुवात होत असली तरी मे महिन्यात तर उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला असतो. उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपण जशी मे महिन्यात स्वत:च्या तब्येतीची, घरातल्या मंडळींची विशेष काळजी घेतो, तशीच विशेष काळजी या दिवसांत आपण आपल्या झाडांचीही घ्यायला हवी. कारण मे महिन्यात उन्हाचा त्रास सोसणं झाडांसाठीही कठीण होत असतं.. म्हणूनच उन्हाळ्यात आणि विशेषत: मे महिन्यात झाडांसाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या, याविषयीची ही सविस्तर माहिती. (Do's and Don't for gardrning in summer)
मे महिन्यात गार्डनिंग करताना करू नका 'या' चुका
१. मे महिन्यात कधीही झाडांची कटींग (cutting of plants) करू नका. बऱ्याचदा झाडांची पानं गळू लागली किंवा झाडांची वाढ कमी होत आहे, असं लक्षात आलं की आपण झाडांची कटींग करतो. पण असा प्रयोग उन्हाळ्यात मुळीच करू नये. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने झाडांना कटींग सहन होत नाही. त्यामुळे ते सुकण्याची किंवा जळून जाण्याची शक्यता जास्त असते.
२. उन्हाळ्यात सकाळी साधारण ९: ३० च्या नंतर आणि सायंकाळी ६: ३० च्या आधी झाडांना पाणी देऊ नये.
३. झाडांची चांगली वाढ व्हावी यासाठी आपण झाडांना बऱ्याचदा रासायनिक (chemical fertilizers) किंवा सेंद्रिय खत देतो. साधारण दर महिन्यात हा प्रयोग झाडांवर केलाच जातो. पण मे महिन्यात खूप जास्त ऊन असताना झाडांना रासायनिक खत देणं टाळा. शक्यतो सेंद्रिय खत देणंही टाळा. खूपच गरज असेल तर अगदी थोड्या प्रमाणात टाका.
४. मे महिन्याच्या कडाक्यात कधीही नविन रोपटं आणून कुंडीत लावण्याचा प्रयत्न करू नका. उष्णतेमुळे रोपटं नविन जागेत रुजण्यास वेळ जातो. अनेकदा तर ते जळून जाण्याची, सुकून जाण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळे नवं रोप लावायचं असेल तर आता थांबा आणि पहिला पाऊस पडल्यानंतरच लावा.
५. कुंडीतल्या झाडांची माती बदलण्याचं कामही उन्हाळ्यात मुळीच करू नये.
६. बागेत काही वेली वाढत असतील तर त्या उन्हाळा संपेपर्यंत फार वर चढवू नका. कारण उन्हाळ्या झळ्या लागून वेल सुकू शकतो. जळू शकतो.
७. बागेत ४ ते ५ तासांपेक्षा अधिक ऊन येत असेल तर झाडांवर एखादं कापडी शेड लावा.