सायली जोशी पटवर्धन
भिशी म्हटली की आपल्याला सगळ्यात आधी आठवते ती काही महिला किंवा पुरुष एकत्र येऊन खाण्यापिण्याचा, गप्पा गोष्टींचा आणि ठराविक रक्कम बाजूला काढण्याचा कार्यक्रम. पण रोपांची भिशी अशी संकल्पना आपण फारशी कधी ऐकली नसेल. आपल्यातील अनेकांच्या घरात कुंडीतली काही रोपं असतात, गॅलरी थोडी मोठी असेल तर आणखी काही मोठी झाडं असतात. कधी आपण सहज आवडीनं लिंबू, कडीपत्ता, गवती चहा अशा औषधी गोष्टींचीही लागवड केलेली असते. आता हे झालं आपल्यापुरतं, आपल्याकडची जागा, गरज आणि आपली आवड लक्षात घेऊन आपण हे सगळं करत असतो. पण आपल्यासारख्याच बागकामाची आवड असणाऱ्या आणखी काही लोकांना एकत्र करुन हे काम केले तर?
बागकामाबाबत एकमेकांना सज्ञान करण्याचे, रोपांची कापणी केल्यावर त्यांची एकमेकांमध्ये वाटणी करण्याचे आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांना बागकामाबाबत जागृत करण्याचे काम पुण्यातील काही महिला अगदी जाता जाता करत आहेत. यासाठी आपण फार मोठे काहीतरी करतो असे या महिलांना वाटतही नाही. पण एकीकडे प्रदूषणामुळे अनेक समस्या आ वासून उभ्या राहील्या असताना त्यांचा हा छोटासा प्रयत्न हिरवाई टिकवायला आणि लोकांमध्ये जागृती करायला नक्कीच उपयुक्त ठरतोय यात वाद नाही. तर कोरोना काळात जवळपास २ वर्षे आपण सगळेच घरात होतो. घराच्या बाहेर पडणे म्हणजे तेव्हा अगदीच भितीचे वाटत होते. त्यावेळी आपण सगळेच कधी वेगवेगळे पदार्थ बनवून तर कधी बागकामासारखे आपले छंद जोपासून आपला वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करत होतो. याच संधीचा फायदा घेत प्राध्यापक डॉ. विनया दिक्षित यांनी रोपांच्या भिशीची संकल्पना मांडली आणि काही दिवसांतच ही संकल्पना या भागात इतकी रुजली की आता जवळपास १०० हून अधिक महिला यामध्ये सक्रीयपणे सहभागी झाल्या आहेत.
विनया दिक्षित पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असून कोरोनासारख्या काळात स्वत:ला सकारात्मक ठेवणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व ओळखून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. पुण्याच्या सहकार नगर भागातील महिलांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला असून आता अनेक जणी यात अतिशय उत्साहाने काम करत आहेत. आपल्या घरातील कापणी केलेल्या रोपांची कलमे, काही रोपांच्या बिया ज्यांना हव्या आहेत त्यांना देणे आणि आपल्याला ज्या रोपांची कलमे किंवा बिया हव्या आहेत त्या आपण घेऊन जाणे अशी ही अगदी साधी सोपी संकल्पना. पण एकमेकांच्या मदतीने या काळात आणि आताही या भागातील नागरीकांच्या बागा अक्षरश: फुलांनी आणि फळांनी फुलून गेल्याचे पाहायला मिळाले.
एखादा दिवस ठरवून एखाद्या सोसायटीच्या किंवा बंगल्याच्या पार्कींगमध्ये सगळ्यांनी आपल्याकडे असलेली रोपे, बिया आणून ठेवायच्या आणि ज्यांना जे हवे आहे त्यांनी ते घेऊन जायचे आणि आपल्या बागेत लावायचे. गेल्या अडीच वर्षात ही संकल्पना इतकी छान रुजली की ज्यांनी याआधी कधीही बागकाम केलेले नव्हते असेही कित्येक जण त्यामध्ये अगदी खुशीने सहभागी झाले आहेत. इतकेच नाही तर ज्यांच्याकडे थोडी जास्त जागा आहे त्यांनी आपल्या जागेत केलेले प्रयोग इतरांना सांगतात. कोणी लहान कुंडीत एखादे पीक कसे घ्यायचे हे सुचवते तर कोणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने खत कसे तयार करायचे याबाबत माहिती देते.
आता या आगळ्या वेगळ्या रोपांच्या भिशीच्या गटाने चांगले बाळसे धरले असून आपल्या गटातील सदस्यांसाठी काही महिन्यातून एखादे छोटेसे एकत्रिकरण, आपले बागकामाबाबतचे अनुभव सांगणाऱ्या चर्चा यांचे आयोजन नियमितपणे केले जाते. हे सगळे कोणत्याही आर्थिक व्यवहारांविना होत असल्याने प्रत्येक जण याठिकाणी केवळ बागकामाची आवड, विविध रोपांविषयीची माहिती घेणे अशा निर्मळ उद्देशाने सहभागी होतात. दिसायला हा उपक्रम लहान वाटत असला तरी या बागकामामुळे किंवा त्याबाबतच्या जागृतीमुळे आज कित्येक जण यामध्ये चांगल्या अर्थाने आपले मन रमवत आहेत. त्यामुळे घरातील बागकामाबाबत जागृती होऊन रोपांना पालवी तर फुटतेच पण काही कारणाने निराश झालेल्या मनांनाही नवी पालवी फुटत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने किंवा सहजच असा आगळावेगळा उपक्रम आपण राहतो त्या भागात आपण राबवू शकतो का याचा प्रत्येकाने विचार करायला काय हरकत आहे?