मनीप्लान्ट म्हणजे बहुतांश घरांमध्ये आढळून येणारी वेल. बाटलीमध्ये, कुंडीमध्ये, मातीच्या मडक्यामध्ये अगदी काही ठिकाणी तर चिनीमातीच्या बरण्यांमध्येही मनीप्लान्ट (Tips for growing money plant well) लावलेला दिसून येतो. बरं ही वनस्पती अशी आहे की ती तुम्ही काही दिवस घरातही ठेवू शकता, काही वेळा अंगणातल्या सावलीतही ठेवू शकता आणि काही वेळा कडक उन्हात राहिली तरीही चालून जाते. कोणतीही काळजी न घेताही मनीप्लान्ट चांगला ( how to keep money plant evergreen) वाढतो, असं बरेच जण म्हणतात. पण खरंतर तसं नाहीये. ती एक सजीव वनस्पती आहे. त्यामुळे तिची थोडीफार काळजी घेणं, तिला काय हवं- नको ते बघणं गरजेचंच आहे. म्हणूनच तर अनेक घरांमध्ये मनीप्लान्टचा वेल चांगला वाढत नाही.
मनीप्लान्ट चांगला वाढावा म्हणून...
मनीप्लान्ट बाबतीत एक मात्र अगदी खरं आहे की या झाडाची आपल्याला विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. बाकीच्या झाडांना जसं ठराविक कालांतराने खतपाणी घालावं लागतं, माती बदलावी लागते तसं काहीही खास असं मनीप्लान्टसाठी करावं लागत नाही. पण तरीही झाड- वेल म्हटलं की त्याचे काही नियम आणि पथ्यपाणी आलंच. तेवढं सांभाळलं की बघा मग तुमचाही मनीप्लान्ट कसा जोमाने वाढतो ते. मनीप्लान्टची वाढ चांगली व्हावी, यासाठीच या काही खास टिप्स.
१. माती
झाड- वेलींच्या चांगल्या वाढीसाठी माती, कोकोपीट आणि खत यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट जमणं गरजेचं असतं. तुम्ही हँगिग पॉटमध्ये लावणार असाल किंवा मग जमिनीवर ठेवलेल्या कुंडीत लावणार असाल तरी मनीप्लान्टसाठी वजनाने हलकी माती असावी. अशी माती तयार करण्यासाठी अर्धा हिस्सा माती आणि उरलेल्या अर्ध्या भागात ५० टक्के खत आणि ५० टक्के कोकोपीट घ्या.
२. पाणी किती घालावं
मनीप्लान्टला खूप जास्त पाण्याची गरज नसते. माती ओलसर राहील एवढंच पाणी त्याला पुरेसं आहे. खूप पाणी घातलं तर वेल सडतो किंवा मग पानं पिवळी पडतात. तसंच पाणी कमी झालं तर वेल सुकून जातो आणि त्याची चांगली वाढ होत नाही.
पहिला पाऊस झाल्यानंतर लावली तर उत्तम रुजतात ही 7 रोपं, मौसम बेस्ट-निवडा रोपं परफेक्ट
३. कुंडीची निवड
मनीप्लान्टसाठी कुंडी निवडताना ती शक्यतो पसरट निवडावी. लहान तोंड असणाऱ्या कुंडीपेक्षा पसरट कुंडीतला मनीप्लान्ट आणखी वेगात वाढतो. कारण लहान तोंड असणाऱ्या कुंडीत जेव्हा आपण पाणी टाकतो, तेव्हा त्याची काही पानं ओलीच राहतात, जास्त पाणी झाल्याने सडतात. ही समस्या पसरट कुंडीत जाणवत नाही. त्यामुळे त्याची वाढ चांगली होते.
४. लटकता मनीप्लान्ट अधिक चांगला
काही वेली वर वाढवल्या तर अधिक चांगल्या वाढतात. पण मनीप्लान्ट जर हँगिंग ठेवला तर तो अधिक चांगला वाढतो. त्यामुळे शक्य तो मनीप्लान्ट हँगिंग ठेवा किंवा मग तो बुशी म्हणजेच खूप बहरलेला करायचा असेल, तर त्याची वाढलेली पाने पुन्हा दुमडून कुंडीतल्या मातीत खोचून द्या.