Join us  

तुळशीच्या पानांना किड लागली करा ४ सोपे उपाय, तुळस पुन्हा येईल नव्यासारखी बहरुन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 8:25 AM

Tips to keep basil plant green & healthy : How to make basil plant green again : अंगणातील तुळशीच्या रोपाला लागली किड तर करा झटपट सोपे घरगुती उपाय...

आपल्या सगळ्यांच्याच अंगणात तुळशीचं एखाद छोटसं रोप असतंच. आपल्याकडे भारतीय परंपरेत तुळशीला फार महत्व असते. पूजाविधी पासून ते अनेक छोट्या - मोठ्या आजारांवर औषध म्हणून तुळशीच्या पानांचा वापर हमखास केला जातो. तुळशीच्या इवलुशा पानांचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो. अंगणातील तुळस कायम बहरुन हिरवीगार झाली तर अशी तुळस पाहून आपल्याला आनंद होतो. याउलट, जर तुळस मरगळलेली असेल, रोपाची वाढ व्यवस्थित होत नसेल किंवा पानांवर किड लागून पान गळती होत असेल तर अशी तुळस पाहून आपण ती बहरुन येण्यासाठी अनेक उपाय करुन पहातो(How to make basil plant green again).

पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा ओलावा आणि रोपाला लागलेली किड यामुळे तुळशीचं रोपं खराब होते. अशावेळी या रोपाची वाढ व्यवस्थित होत नाही, पानं गळू लागतात, किंवा तुळशीच्या रोपाला पान येणंच बंद होतं अशा अनेक तक्रारी उद्भवतात. अंगणातील तुळस कायम हिरवीगार राहावी तसेच पानांवरील किड मरून तुळस बहरुन जावी यासाठी काही खास सोपे उपाय करुन पाहूयात(Tips to keep basil plant green & healthy).

तुळशीच्या रोपावर किड लागली असेल तर काय करावे ? 

१. कडुलिंबाचे तेल आणि साबणाचे पाणी :- जर तुमच्या तुळशीच्या रोपाला किड लागली असेल तर आपण कडुलिंबाचे तेल आणि साबणाच्या पाण्याचा वापर करु शकता. यासाठी सर्वात आधी कोणताही साबण आणि पाणी घेऊन त्या साबणाचे पाणी तयार करुन घ्यावे. आता या साबणाच्या पाण्यांत कडुलिंबाचे तेल घालून दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिसळून एका एअर टाईट कंटेनरमध्ये हे तयार द्रावण भरुन ठेवावे. हे तयार द्रावण तुळशीच्या रोपावर दिवसातून ३ ते ४ वेळा स्प्रे करावे. यामुळे पानांवरील किड मरुन जाण्यास मदत मिळते. 

२. पुदिन्याच्या पानांचा वापर :- तुळशीच्या रोपावरील किड काढून टाकण्यासाठी आपण पुदिन्याच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. आता लसूण पाकळ्यांच्या रसात पुदिन्याची पेस्ट किंवा पेस्ट मिक्स करुन झाडावर फवारणी करा. असे केल्याने काही दिवसात किडींपासून सुटका होईल.

३. हिरव्या मिरच्यांचा वापर :- तुळशीच्या रोपांवरील किड घालवण्यासाठी आपण हिरव्या मिरच्यांचा वापर देखील करु शकतो. यासाठी हिरव्या मिरच्या घेऊन त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. या वाटून घेतलेल्या मिरच्या एका बाऊलमध्ये काढून मग त्यात पाणी घालून त्याचे द्रावण तयार करुन घ्यावेत. आता हे मिरचीच्या पाण्याचे तयार द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन तुळशीच्या रोपांवर स्प्रे करुन घ्यावे. 

४. तुळशीचे रोप वेगळे ठेवा :- जर तुळशीच्या रोपावर किड लागून रोपं खराब होत असेल तर असे रोप आपल्या गार्डनमधील इतर रोपट्यांपासून थोडे लांब ठेवावे. असे न केल्यास या रोपांमधील किड गार्डनमधील इतर रोपांनां देखील लागण्याची शक्यता असते.

टॅग्स :बागकाम टिप्स