सतत चावणारे डास आणि त्यामुळे येणारी खाज याला तुम्ही वैतागले असाल तर एक सोपा उपाय आहे. घरात काही विशिष्ट प्रकारची रोपं लावल्यानी हे डास पळवून लावायला मदत होते. पावसाळी दमट हवा आणि त्यामुळे ठिकठिकाणी होणारे डास यांना आपण सगळेच वैतागतो. मग वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर नाहीतर डासांना मारणारी रॅकेट घेऊन बसणे याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण ही केमिकल्सचा आरोग्याला घातक असतात. लहान मुलांना आणि इतरांनाही त्यामुळे त्रास होऊ शकतो. घराच्या आजुबाजूला असलेला कचरा, गवत आणि पाण्याची डबकी यांमुळे दिवसा आणि रात्रीही वेगवेगळ्या प्रकारचे डास आपल्या कानाशी सतत गुणगुणत असतात. ह डास चावल्याने डेंगी, चिकनगुन्यासारखे गंभीर आजारांचे प्रमाणही वाढल्याचे मागील काही वर्षात आपण पाहत आहोत. त्यामुळे या डासांपासून सुटका करुन घेण्याचा सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पाहूयात घरात कोणती रोपं लावली तर डासांपासून तुमची सुटता होऊ शकते.
१. झेंडू - झेंडूचे फूल आपण घरात नियमितपणे देवाला वाहण्यासाठी किंवा इतर धार्मिक बाबींसाठी वापरतो. त्यामुळे तुम्ही गॅलरीमध्ये किंवा घराच्या खिडकीत झेंडूचे रोप लावल्यास घरात डास येण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. झेंडूचे रोप कुठेही सहज उपलब्ध होणारे असते. तसेच केशरी आणि पिवळ्या रंगाची ही फुले दिसतातही आकर्षक त्यामुळे तुमच्या घराची शोभा वाढण्यासही मदत होईल. या फुलांना असलेला वास काहीसा उग्र असतो. त्यामुळे डास, माशी यांना तो वास अजिबात आवडत नाही. म्हणून हे झाड लावलेले असेल त्याठिकाणी डास फिरकत नाहीत. तुम्ही एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या रंगांचे झेंडू घरात लावू शकता.
२. लवेंडर - लव्हेंडर हे झाड तुम्ही घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या आतही ठेवू शकता. खाली गवतासारखी असणारी पाने आणि वर जांभळ्या रंगाची आकर्षक फुले अतिशय सुंदर दिसतात. या झाडामुळे डास घरात येत नाहीत. त्यामुळे तुम्ही झोपत असलेल्या बेडरुममध्ये हे झाड लावल्यास रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून तुमची सुटका होऊ शकते. ही झाडे सगळ्या ऋतूमध्ये सहज मिळत असल्याने आणि वाढत असल्याने ते आवर्जून घरात लावायला हवे. या फुलांचा वास डासांना घरात येण्यापासून दूर ठेवतो.
३. गवती चहा - गवती चहाला एकप्रकारचा गोडसर वास असतो. त्यामुळे तुम्ही बाल्कनीत हे लावल्यास डास घरात येण्यापासून बचाव होतो. हे गवत मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी तुम्ही एखाद्या मध्यम आकाराच्या कुंडीत ते लावू शकता. हे गवत वाढले की ते कापून तुम्ही चहात घातले तर त्याचे शरीरासाठीही औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे आरोग्याला उपयुक्त आणि डास पळवून लावण्यासाठी फायदेशीर असा गवती चहा घरात जरुर लावा.
४. तुळस - तुळशीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीयदृष्ट्याही तुळस अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. हवेतील कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण कमी करुन ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी तुळस अतिशय उपयुक्त ठरते. तसेच डासांना दूर ठेवण्यासाठी तुळशीचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुमच्याकडे एकाहून जास्त ठिकाणी तुळशीची रोपे असतील तरीही चांगले.
५. पुदीना - ही औषधी वनस्पती असून विविध औषधांमध्ये आणि स्वयंपाकातील पदार्थांतही पुदीन्याचा उपयोग होतो. या वनस्पतीला उग्र वास असल्याने डास लांब राहण्यास मदत होते. पुदीना घरातील कुंडीतही अगदी सहज वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही डासांना दूर ठेवण्यासाठी हे रोप घरात आवर्जून लावायला हवे.