अंजना देवस्थळे
आपलं एक स्वप्न असतं, एक छोटीशी बाग असावी. त्या बागेत आपण काही निवांत क्षण घालवावे, चिऊला दाणा द्यावा. परडीतून फुलं-भाज्या खुडून आणाव्या! काश, हे स्वप्न शहरात-निमशहरातल्या आपल्या इमारतीतल्या लहानशा घरात, बाल्कनीही नसलेल्या बीएचकेच्या घरात पूर्ण होऊ शकले तर जागाच नाही, घराला बाल्कनीच नाही, ऊनच येत नाही, वाटतं खूप पण दोन कुंड्या लावायच्या तर जागा नाही. बाल्कनी असती छोटी तरी जमलं असतं.. हे सारं बरेच जण सांगतात.
तुम्हाला सांगते, आम्ही ठाण्याला दहाव्या मजल्यावर राहतो. घराला गच्ची नाही, बाल्कनी नाही. बागकामाची हौस भागवायची तर आहे त्या फक्त खिडक्या. मात्र या खिडक्यांमध्येही आम्हाला निसर्गात रमण्याचा आनंद पुरेपूर लूटता येतो. दिवसाची सुरुवातच मुळाच खिडकीतल्या गवती चहाच्या पातीने होते. मूडनुसार चहाची रंगत वेगवेगळ्या वनस्पती वाढवतात. कधी पेपरमिंटची चार पानं तर कधी लिंबाची. चहा पिता-पिता चिऊ-राघू येतात दाणा टिपायला तर कधी शिंजिर येतो जास्वंदातला मकरंद टिपायला. स्वयंपाकाला कधी कडीपत्ता खुडायचा, कधी अळूची तर कधी मायाळूची पानं काढायची. पाऊस पडू लागला तर ओव्याची. आठवड्या-दोन आठवड्यात वांगी कारलीपण निघतात. रात्र झाली की कामिनीच्या मधूर सुवासात शांतपणे बसायचं.
अर्थात शहरात अशा छोट्याशा जागेत बाग साकारताना काही मर्यादा असतातच. जागा, सूर्यप्रकाश, वेळ महत्त्वाचा. बागकामाचं कौशल्य म्हंटलं तर ते अवगत करणं फार काही अवघड नाही. मुळात वनस्पती अत्यंत सोशिक असतात. त्यामुळे आपल्या छोट्या चुका त्या माफ करतात. हळूहळू आपणही शिकतो, त्या शिकण्यात जास्त मजा आहे. कारण या वाटेवर प्रत्येक क्षण आनंददायी ठरतो. बियांचं रुजणं, नवीन कोंब फुटणं हे सारं नित्य नवं असतंच.
त्यासोबत झाडांच्या काही गरजा जर आपण पुरवू शकलो तर मग आपली बाग छान फुलायला लागते. झाडांना पाणी हवं ही गरज तर आपल्याला माहिती असतेच; पण त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे सूर्यप्रकाश. झाडांना त्यांच्या प्रकृतीनुसार कमी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते.
फुलझाडं, फळ झाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. गुलाबाच्या रोपट्यांना सूर्यप्रकाश कमी मिळाला तर फुलं येणं तर दूर ते जेमतेम जगतं.
त्यामुळे आपण आपल्या बाल्कनीत, खिडकीत बाग लावणार, जी काही रोपं लावणार, ती लावताना सूर्यप्रकाशाचा विचार आधी करायला हवा. जिथं आपल्याला बाग थाटायची तिथल्या दिशांप्रमाणे किती सूर्यप्रकाश येतो आणि त्या दिशांप्रमाणे झाडं निवडली तर आपली झाडं छान रुजतात. उदाहरणार्थ पूर्वेकडे फुलझाडं, फळभाज्या लावणं उत्तम. पश्चिमेकडे -दक्षिणेकडे वेली आणि उत्तरेला जिथे उजेड असतो; पण सूर्यप्रकाश नाही तिथं कमी सूर्यप्रकाश लागणारी झाडं लावावी.
कशी करायची सुरुवात?
हा पहिलाच प्रश्न सुरुवात कशी करायची? दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फार खर्चिक असेल का हा नवीन छंद? तर नाही. दोन्ही प्रश्नांचं उत्तर हेच की इथं आपली कल्पकता महत्त्वाची. आपली अगदी संपूर्ण बाग आपण बाहेरून एकही वस्तू विकत न आणता साकारू शकतो.
जुने टाकाऊ डबे, बादल्या, माठ, करवंट्यांचा वापर कुंड्या म्हणून करता येतो. फक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली एक चांगलं मोठं छिद्र पाडावं लागतं. घरातला ओला कचरा, परिसरात पडलेला पाला पाचोळा मातीला उत्तम पर्याय आहे आणि राहिला प्रश्न बिया-रोपं. तर त्या आपल्या स्वयंपाकघरात मुबलक प्रमाणात सापडतात. धणे पेरले की कोथिंबिर उगवते. मेथी पेरली की अगदी आठव्या दिवशी अगदी मुळासकट भाजी करते येते. बाळंतशोपा पेरल्या की शेपू उगवते. मोहरली पेरली की सरसोंका साग घरी मस्त करता येतो. चवळी, वाल, हरभरे पेरले की त्याच्या शेंगा येतात आणि सुक्या लाल मिरच्यातून मिरचीचं बी मिळतं. एवढंच काय भाजीवाल्याकडून पिकलेल्या कारल्याच्या बिया, मोड आलेले कांदे आणून ते लावता येतात.
अर्थात फळभाज्या लावायला जरा जास्त जागा लागते; पण मिरचीचं रोप रुजलं तर गरजेपुरत्या मिरच्या हमखास मिळतात. सर्वात सोपी फळभाजी कोणती माहिती आहे?
कारलं! कारल्याचा वेल लावला हो सासूबाई..हे गाणं जेवढ्या सहजतेनं म्हटलं जातं ना, तेवढंच सहज हा नाजूक पानांचा वेल भरभर वाढतो. त्याला नाजूक फुलंही लागतात आणि बघताबघता कारली प्रकट होतात. गंमत म्हणजे ही कडू कारली घरातली सगळी माणसं मुलांसह मिटक्या मारतात खातात. कारण त्याला आपल्या घराच्या प्रेमाची चव असतेच. काहीवेळा आपल्या जागेत पुरेसं ऊन येत नाही. अशासाठी पण कारली हा उत्तम पर्याय आहे.
दुसरं म्हणजे अळू. भाजीचा-वडीचा अळू लावला तर छान फोफावतो. त्यासाठी कुणाकडे अळू असेल तर त्याचे कंद आणून लावावे नाही तर भाजीवाल्याकडून अरबी आणून लावावी. मायाळूचा वेलही कमी उन्हात छान वाढतो. त्याची पानं मोठी आणि तजेलदार होतात. नागवेलीला तर असा कमी सूर्यप्रकाश मानवतोच. घरी वेलाला लागलेली तरतरीत पानं नुसता चुना काथ लावूनही गोड लागतात.
भाज्याच कशाला. अडूळसा. हळद, पुदिना, ब्राह्मी यासारख्या औषधी वनस्पतीदेखील सहज लावतात येतात.
पण काळजी कशी घेणार?
झाडं लावणं तसं सोपं आहे. पण त्यांची योग्य काळजी कशी घेणार? तेही फारसं अवघड नाही. झाडांची वाढ चांगली व्हावी म्हणून त्यांना खतांची गरज असते. घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या खतात सेंद्रिय पदार्थ आणि पोषक मूल्ये असतं. स्वयंपाकघरातल्या अनेक गोष्टी झाडांच्या वाढीसाठी फार गुणकारी असतात. आंबट ताक, अगदी पातळ करुन गाळून झाडांवर फवारणीसाठी वापरलं तरी त्यांची वाढ चांगली होतेच, पण त्याचबरोबर कीड - रोगही लागत नाही. केळीच्या - कांद्याची सालं पाण्यात बुडवून ठेवली आणि ते पाणी झाडांना दिलं तर फुलं चांगली येतात. डाळ - तांदूळ धुतलेलं पाणीही झाडांना घालावं. त्यानं झाडांची वाढ तर चांगली होतेच आणि पाण्याचा पुुन: वापरही होतो. कीड लागली असेल तर हिरवी मिरची, लसूण आलं वाटून गाळून पाण्यात मिसळून (असल्यास गोमूत्र घालून) फवारावे. अनेक प्रकारच्या किडींवर हा रामबाण उपाय आहे.
पाणी किती घालायचं?
हा प्रश्न अनेकांना पडतो. झाडं जगावी म्हणून भरपूर पाणी घालत सुटतात. मात्र, पाणी घालताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत.
कुंडीतून पाण्याचा निचरा चांगला व्हायला हवा. कुंडीत पाणी साचता कामा नये. अनेकवेळा पाणी साचून राहिल्यामुळे झाडं दगावतात.
योग्य प्रमाणात पाणी द्यावं. जास्त पाणी घातलं तर मातीतले क्षार वाहून जातात आणि ते वरुन खालच्या मजल्यावर पडू लागलं तर तक्रारी आणि प्रसंगी भांडणं वाढतात.
झाडं वाढली की पाखरं येतातच...
एकदा का झाडं वाढू लागली की, पक्ष्यांना - पाखरांच्या विश्वात त्याची खबर पोहचतेच. आपोआप फुलपाखरं, चिमण्या येऊ लागतात. क्वचित ते पानं खुडतात. कळ्या तोडतात. त्याकडे जरा कानाडोळा करावा. कारण आपल्याला त्यांचा जो सहवास मिळतो, ताे फार आनंददायी असतो.
श्रावण आता आला आहेच, दार उघडून त्याचं स्वागत करावं. शेतीची कामं तर सुरुच आहेत. पण शहरातल्या लहानशा घरातही जमेल तसं त्याला घरात घ्यावं आणि आपली बाग फुलवावी. निसर्ग भरभरुन देतोच, आपली आनंदानं घेण्याची तयारी असावी.
(लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
anjanahorticulture@gmail.com