अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
झालं असं की घरी आमच्या शेतावरून एक म्हाळुंग आणलं. आता म्हाळुंग म्हणजे? ज्यातून सर्व लिंबाची उत्पत्ती झाली असं एक भलं मोठं लिंबू. त्यातून छान टपोऱ्या बिया निघाल्या. इतक्या छान बिया टाकून कशा द्याव्या म्हणून एका लहानशा कुंडीत त्या पेरल्या. सगळ्या बिया रुजल्या, त्यांची हिरवीगार रोपं तयार झाली. बरं वाटायचं ती रोपं बघून. रोपं वाढू लागली, त्या कुंडीत दाटी वाढत होती. त्यांचं पुढे कसं काय होणार असं कधी तरी आलं मनात.
एवढ्याशा कुंडीत रोपांची एवढी गर्दी, कधी पाणी कमी पडलं म्हणून कोमेजायची म्हणून त्या कुंडीला स्वयंपाकघरातल्या खिडकीत आणून ठेवलं.
एकदा पाणी घालताना पान जराशी कुरतडलेली आणि त्यावर पक्ष्याची विष्टा दिसली. मी चकित झाले. गोंधळले. फुलपाखराचे सुरवंट? इथे?
आमच्या दहाव्या मजल्यावर घरात ठेवलेल्या एवढ्याशा झाडाचा शोध फुलपाखराला लागला कसा, ते घरात येऊन त्यावर अंडी घालून गेली कधी? शेतकी कॉलेजमधला कीटकशास्त्राचा पेस्ट्स ऑफ सिट्रस धडा आठवला ! संत्र, लिंबू, कढीलिंबची पान खाऊन क्वचित हैदोस घालणाऱ्या फुलपाखराची ही कार्टी. यांचा नायनाट करायचे असंख्य रासायनिक प्रकार आम्हाला शिकवले होते!
पण मग आता काय करावं?
करावं की न करावं?
वाढवूया ही पिल्लं असं ठरवलं आणि आमच्या स्वयंपाकघराचा एक कोपरा पाळणाघरात रूपांतरित झाला. सारं घरदार बेबी सिटिंग मोडवर आलं. बाळांना मोठं करण्याची जबाबदारी जणू आमचीच. खरं तर त्यांना आमचं काही पडलं नव्हतं. दिवसरात्र पान खायची आणि ह...चे!! नशीब आमचं, डायपरची भानगड नव्हती.
जाता-येता त्यांच्यावर नजर असायची, आणि जाता-येता काहीतरी नवीन घडलेलं असायचंच. ते लहानशे चिमणीच्या विष्टे एवढेच ठिपके वाढत वाढत कबुतराच्या विष्टेएवढे झाले. त्यानंतर अचानक एके दिवशी ते दिसेनासे झाले.
छदमी सुरवंटांनी रातोरात रंग बदलेला होता. त्यांची काया पालट झाली होती, आता ते देखणे हिरवे झाले होते. पण हिरव्या पानात दिसू न येणारे !!
रंग बदलला, अंगावर भरपूर बाळसं धरलं आणि खाण्याचा सपाटा वाढला होता. माझ्या हिरव्यागार डावरलेल्या कोवळ्या रोपांचा पार खराटा झाला. बाळ उपाशी राहू नये म्हणून कढीपत्त्याची कोवळी पान अलगद त्या कुंडीत ठेवली, तीही फस्त झाली. पूर्वी त्यांची शी, गोल काळी असायची, एकदा अचानक हिरवीगार पातळ शी झाली आणि त्यांनी खाणं सोडलं. मग एकानं स्थलांतर केलं, शेजारच्या शोभेच्या झाडावर बस्तान मांडलं आणि एखाद्या योगी तपस्वीने समाधी लावावी असा आधार न घेता आडवा झाला. कोषात गेलेल्या बाळाकडेपण आम्ही डोळे लावून होतोच. आधी फिकट रंगाचा कोष बघता बघता काळपट झाला आणि परत बाळंतपणाचे वेध लागले, प्रसूती कधी होईल? मुलगा होतो की मुलगी? लिंबाच्या झाडावर येणाऱ्या ह्या फुलपाखरांच्या मादी नरांपेक्षा जास्त आकर्षक असतात.
आणि सकाळी उठून डोळे चोळत पहिले गेले तर...अरेचा.. कोष फाटलेलं... रिकामं!!
छताकडे नजर फिरवली आणि म्हंटलं... ‘मुलगा झाला हो’!!
पंखा बंद केला, खिडकी उघडली. ते नव्हे तो फुलपाखरू जरा वेळ आम्हाला आनंद द्यायला, स्वयंपाक घरात घुटमळला आणि आमच्या न कळत खिडकीतून कधी मोकळ्या आकाशात निघून गेला कळलंच नाही. आता आम्हा सर्वांनाच एमटी कोष सिंड्रोम झालाय!!
आमच्या घरी प्रसूती झालेल्या फुलपाखराबद्दल काही माहिती...
त्याचे शास्त्रीय नाव Papilio polytes, इंग्रजी नाव Common Mormon. ही नावं जरी अवघड वाटली तरी त्यात गंमत आहे, papilio म्हणजे latin मधे फुलपाखरू. पण फुलपाखरू कसं तर अनेक रूपं धारण करणारा म्हणून मराठीत अत्यंत समर्पक नाव ठेवलंय
‘बहुरूपी’. नर फुलपाखराचे पंख काळे आणि खालच्या पानांवर पांढऱ्या ठिपकांचा पट्टा. मादी खूपच आकर्षक, तिच्या खालच्या पंखांना लाल ठिपके असतात.
फुलपाखरं मध चोखायला जरी कोणत्याही फुलांवर जात असले तरी अंडी मात्र लिंबूवर्गीय झाडांवरच घालतात. त्यांची पोरं खाण्याच्या बाबतीत अत्यंत नाठाळ, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. लिंबूवर्गीय म्हणजे फक्त लिंबूवर्गीयच!!
anjanahorticulture@gmail.com