आपल्या घरात छोटसं का होईना होम गार्डन असतंच. कधी गॅलरीत, कधी खिडकीच्या ग्रीलमध्ये तर कधी दारात आपण ५-७ तरी रोपं लावतोच. तुळस, गुलाब, शेवंती, जास्वंद, मोगरा सदाफुली ही त्यामध्ये असणारी काही ठरलेली रोपं. याशिवाय गेल्या काही वर्षात इनडोअर प्लांटस, लटकणाऱ्या किंवा घराची सजावट म्हणून लावल्या जाणाऱ्या विविध रंगांच्या, आकाराच्या वेली याही घरोघरी असतातच. घरात थोडी जरी रोपं असली तरी त्यांची काळजी घेऊन निगा राखावीच लागते. या रोपांना फुलं यावीत, ती छान हिरवीगार राहावीत असं आपल्याला साहजिकच वाटतं. त्यामुळे फक्त रोपं लावून किंवा त्यांना रोज पाणी घालून काम होत नाही. तर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते (Use of Ginger for plants growth easy home gardening tips).
महिन्यातला एखादा विकेंड तरी आपण या रोपांसाठी राखून ठेवतो आणि त्यांची छाटणी, खत घालणे, किटकनाशक फवारणे असे काही ना काही करतो. यामुळे वाळून गेलेली रोपं नव्याने फुलण्यास मदत होते. पण बाजारात या खतांची आणि किटकनाशकांची किंमत खूप जास्त असते त्यामुळे बरेच पैसे जातात. तसेच खत, किटकनाशकं लक्षात ठेवून नर्सरीतून आणावे लागते. या दोन्ही गोष्टी नको असतील घरच्या घरी करता येईल असा १ सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. ज्यामुळे रोपांना छान बहर येण्यास मदत होईल.
१. आलं ही बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे, साधारण ५ रुपयांचे आले घ्यायचे.
२. आल्याचे पातळ काप करुन ते ५०० मिलीलीटर पाण्यात घालायचे.
३. यामध्ये व्हाईट व्हिनेगर घालून हे मिश्रण रात्रभर चांगले एकजीव होऊ द्यायचे.
४. नायट्रोजन आणि पोटॅशियम यांचा उत्तम स्त्रोत असल्याने रोपांना पोषण मिळण्यास याची चांगली मदत होते.
५. रोपं छान हिरवीगार राहावीत आणि त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त ठरते.
६. याशिवाय हे पाणी गाळून स्प्रे बाटलीने रोपांवर मारल्यास रोपांना लागलेली कीड निघून जाण्यास आणि छान वास येण्यास मदत होते.