डॉ. अंजना भंडारी
वटपौर्णिमा. या दिवशी सर्व सुवासिनी व्रत म्हणून मोठ्या भक्तीभावाने वड पुजायला जातात. आंबा, फणस, जांभूळ, बाभूळ अशा प्रकारच्या झाडांची पूजा न करता आवर्जून वडाची पूजा का केली जाते. तर याला कारण म्हणजे वडाचे शास्त्रीय गुणधर्म. जगात सर्वात दाट सावली देणारा वृक्ष म्हणजे वड. वडाच्या पारंब्यांमधून सतत पाणी वाहत असत त्यामुळे जिथे वडाचे झाड असते त्या खालची जमीन सदैव ओलसर असते. आणि त्यामुळे पर्यायाने तेथील जागा कायम थंड असते. वड हा वृक्ष १०० पेक्षा जास्त वर्षे जगतो. म्हणून वडाची पूजा करण्याचं महत्त्व!
जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणजे वड. ज्येष्ठ महिन्यातील उन्हामुळे जीव घुसमटतो. पुराणात सत्यवान सावित्रीची गोष्ट आहे. लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. तो गरमीने त्रासला होता. ऑक्सिजन कमी पडल्याने तो कासावीस होऊन शुद्ध हरपून पडला. योगायोगाने सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली आणले. वडाच्या सावलीत, पारंब्यांच्या तुषारामुळे आणि थंडाव्यामुळे त्याला बरे वाटले आणि तेथे ऑक्सिजन मिळाल्या मुळे तो लवकर शुद्धीवर आला. हीच खरी गोष्ट पुढे तीला सावित्रीने पतीचे प्राण वाचविले सांगून रंजक बनवली गेली असेल.
वटपौर्णिमेस वडाची पूजा करण्या बरोबरच वडाचे एखादे रोप लावून ते वाढवले तर जास्त फायदा (पुण्य) मिळू शकेल. केवळ पतीच्या नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या शतायुष्यासाठीच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेसाठी साजरा करावा असा हा सण आहे. वड पुजताना आपल्याला आपल्या भोवतीच्या स्थानिक झाडांचंही महत्त्व माहिती असलेलं उत्तम.