कुणाची तरी लहानपणीची आठवण असते. आजोळची. घराबाहेर असलेल्या भाज्यांच्या आणि फुलांच्या वेलांची. पाऊस पडून गेला की वेलांवरचे तुषार अंगावर पडतात. मंद गंध सगळीकडे भरुन राहतो. पण शहरात, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसांचा प्रश्न असा की जागाच इतकी कमी की वेल लावणार कुठं? बाल्कनीत, कुंडीतही भाज्यांचे वेल लावता येऊ शकतात. खरंतर त्या भाज्या येतातही पटकन आणि घरी ताज्या ताज्या खाताही येतात.
वेल लावण्यासाठी मध्यम आकाराच्या कुंड्या पुरतात. फार मशागत करावी लागत नाही. आपण तारा बांधून कमी जागेतही कल्पकतेनं आपला वेल फिरवू शकतो. थोडी काळजी घेतली तर हे वेल वर्षभर भाज्या देतात. ताज्या, सेंद्रिय भाज्या खाण्याचा आनंद घरी सहज मिळतो.
वेलवर्गीय भाज्या लावण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती हव्या. नियोजनही करायला हवं.
१. बालकनीत लाल भोपळा आणि दुधी भोपळा लावण्यासाठी कुंडीच्या चारही बाजूनी किमान चार फूट जागेची गरज असते. त्यांना जागा जास्त लागते पण म्हणून मग आपण बाल्कनीत कारली, काकडी, तोंडली या सारख्या भाज्या लावू शकतो.२. तोंडली वर्षभर येतात. मध्यम आकाराच्या कुंडीत त्यांचा वेल वाढतो. मातीत थोडं खत घातलं तर वर्षभर तोंडली मिळतात. वेल मधूनमधून कापून टाकला तर तो किती पसरवायचा हे आपल्याच हातात असतं. तोंडल्याचा वेल वाढवताना मुख्य खोड साधारणतः सहा इंचापर्यंत वाढला की आपण तारा बांधून तो फिरवू शकतो. ३. तेच कारल्याच्या वेलाचंही. एक वेल साधारण दिड वर्ष कारली देतो.
४. काकडी, गिलके, दोडके पावसाळ्याच्या आसपास लावले तर छान वाढतात. ५. वेलांवर फार कीडही पडत नाही. गोमूत्र, नीमची फवारणी, सेंद्रीय खत एवढ्यावरच हे वेल छान वाढतात.६. या वेलांना सुंदर सुगंध असतो, त्यानंही प्रसन्न वाटतं.