आपण सगळेच साधारणपणे दिवसातून किमान ३ वेळा आहार घेतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. या प्रत्येक जेवणात काय असावे इथपासून ते या खाण्यांच्या वेळा, त्यांची पद्धत याबाबत आहारशास्त्रात बरेच नियम सांगितले आहेत. आहाराचा आपल्या आरोग्यात ८० टक्के महत्त्वाचा रोल असतो. उत्तम आणि योग्य पद्धतीने आहार घेतला तर आरोग्याच्या बहुतांश तक्रारी दूर होतात. पण हे नियम पाळले नाहीत तर त्याचाही आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. रात्रीचे जेवण हे दिवसभराच्या आहारातील महत्त्वाचे असून त्यानंतर जास्त हालचाल होत नसल्याने ते हलके असावे किंवा इतर आहारापेक्षा थोडे हलके असावे असे सांगितले जाते. मात्र आपण रात्री एखाद्या पार्टीला किंवा बाहेर गेलो की तिथे नेहमीपेक्षा जास्त खातो. इतकेच नाही तर रात्रीच्या वेळी जंक फूड, गोड पदार्थही खाणे होते मात्र असे करणे चुकीचे असून रात्रीच्या आहाराबाबत काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डींपल जांगडा याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या याविषयी महत्त्वाची माहिती देतात.(3Mistakes to avoid in Dinner)
१. रात्रीच्या जेवणात फळे खाणे
अनेक जण फळं हलकी असतात म्हणून रात्रीच्या जेवणात फक्त फलाहार घेतात किंवा थोडे जेवण करतात आणि त्यानंतर फळे खातात. मात्र फळांमध्ये सक्रिय एंझाईम्स असतात ज्याचा आपल्या शरीरावर कॉफीसारखा परीणाम होतो. फळं शक्यतो दिवसा, ११ वाजता किंवा ४ वाजताच्या स्नॅक टाईममध्ये खाणे केव्हाही चांगले. मात्र सूर्यास्तानंतर फळे खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. रात्री फळे खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते, जे आरोग्यासाठी चांगले नसते.
२. तळलेले किंवा स्निग्ध पदार्थ
खूप जास्त प्रमाणात कर्बोदके असलेले पदार्थ रात्रीच्या जेवणात घेणे टाळावे. पास्ता, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर यांसारखे पदार्थ रात्री खाणे टाळलेले केव्हाही जास्त चांगले. कारण रात्री आपली पुरेशी हालचाल होत नसल्याने या खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही आणि त्याचे चरबीत रुपांतर होते. जास्त तळलेल्या पदार्थांमुळेही अॅसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता असते.
३. कोणत्या भाज्या टाळाव्यात
रात्रीच्या आहारात भाज्या, सॅलेड जास्त प्रमाणात असावे असा आपला समज असतो. म्हणून आपण रात्री सूप किंवा भाज्या घातलेला पुलाव, दलिया असे प्रकार करतो. हे जरी बरोबर असले तरी काही भाज्या रात्रीच्या वेळी खाणे योग्य नसते. यामध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. या भाज्या पचण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने रात्री त्या खाऊ नयेत.
मग रात्रीच्या जेवणात काय घ्यावे?
आपल्या शरीराला असलेल्या गरजेनुसार रात्रीच्या आहारात सूप घ्यायला हवे.
१. ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे अशांनी गाजर, बीट, पालक यांपासून केलेले सूप घ्यावे.
२. तुमच्या शरीरात फॅटस आणि स्निग्धता कमी असेल तर अशांनी भोपळ्याचे सूप घ्यायला हवे.
३. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बाजरीची खिचडी किंवा दलिया आणि नॉनव्हेज सूप घ्यावे. बाजरी फायबरचा उत्तम स्त्रोत असल्याने आरोग्यासाठी ती अतिशय फायदेशीर असते.
४. भातामध्ये भाज्या किंवा मसूर घालून त्याचा पुलाव केल्यास तोही रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
५. रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या ३ तास आधी करावे जेणेकरुन त्याचे योग्य पद्धतीने पचन होण्यास मदत होईल.