ॲसिडीटीची तक्रार अनेक जण सातत्याने करताना दिसतात. कधी पुरेशी झोप झाली नाही म्हणून तर कधी वेळच्या वेळी खाल्ले नाही आणि भूक मारली गेली म्हणून ॲसिडीटी होते. तर काही वेळा नेहमीपेक्षा ४ घआस जास्त खाल्ल्यानेही ॲसिडीटी होते. ॲसिडीटी म्हणजे काय तर आपण खाल्लेले अन्न नीट पचले नाही की पोटात त्याचे एकप्रकारचे ॲसिड तयार होते आणि शरीर हे नको असणारे जास्तीचे ॲसिड पचवू शकत नाही. एकदा ॲसिडीटी झाली की छातीत जळजळ, मळमळणे, डोकं जड होणे अशा समस्या होतात. अनेकांना ॲसिडीटीमुळे उलट्याही होतात. ज्यांना नियमित ॲसिडीटी होते त्यांनाच ॲसिडीटीचा त्रास म्हणजे काय ते माहित असते. मग मेडीकलमध्ये जाऊन जेलोसिल किंवा पॅन सारख्या गोळ्या घेऊन या ॲसिडीटीवर तात्पुरता आराम मिळवला जातो. मात्र या गोळ्या सतत घेणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. मग ॲसिडीटी झाल्यावर घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय कोणते ते पाहूया (4 Easy home remedies to reduce Acid reflux)...
१. डाव्या कुशीवर झोपावे
ॲसिडीटी झालेली असताना आपण डाव्या कुशीवर झोपलो तर त्याचा ॲसिडीटी कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो. संशोधनानुसार, डाव्या कुशीवर झोपल्याने गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जाते आणि त्याचे पचन होण्यास मदत होते.
२. वज्रासनात बसावे
वज्रासन ही खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी अतिशय उत्तम अशी स्थिती आहे. यामुळे गॅसेस आणि ॲसिडीटी दूर होण्यास मदत होते. वज्रासनात बसल्याने खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्त्वे शरीरात योग्य पद्धतीने शोषली जातात आणि ॲसिडीटी दूर होण्यास मदत होते.
३. जेवणानंतर बडीशेप खाणे
बडीशेप ही अन्नपचनासाठी अतिशय उपयुक्त अशी गोष्ट असून पूर्वीपासून आपल्याकडे जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. त्यामागे शास्त्रीय कारण असून पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी बडीशेप अतिशय उपयुक्त असते. गॅसेस दूर होण्यास आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास याचा चांगला उपयोग होतो.
४. शतपावली करणे
जेवणानंतर आवर्जून शतपावली करायला हवी असे वारंवार सांगितले जाते. मात्र आपण त्याकडे तितक्या गांभिर्याने लक्ष देत नाही. पण जेवल्यानंतर चालल्याने जठराग्नी चांगल्या रितीने काम करतो. त्यामुळे शरीरात गॅसेस, अॅसिडीटी राहत नाही आणि अपचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.