ऋतू बदलतो त्यामुळे वातावरणात बदल होतो आणि पर्यायाने त्याचा आपल्या शरीरावर परीणाम होत असतो. हिवाळ्यात हवेत गारठा असल्याने सर्दी-खोकला होतो. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणे, केस कोरडे होणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. इतकेच नाही तर थंडीमुळे अनेकदा हाडांचे दुखणेही डोके वर काढते. थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने हाडे ठणकण्याची समस्या उद्भवते. बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे हाडांचे दुखणे हल्ली कमी वयातच त्रास देते. अशावेळी आहार, व्यायाम यांसारख्या गोष्टींनी या समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणता येतात. हिवाळ्याच्या दिवसांत हाडांचे दुखणे वाढू नये यासाठी आहारात आवर्जून खायला हवेत असे ४ पदार्थ कोणते पाहूयात (4 Super food Useful for Joint pain)..
१. ओली हळद
हळद आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेला घटक आहे. त्यामध्ये असणारा रासायनिक घटक शरीराच्या विविध भागांना येणारी सूज कमी करण्यास उपयुक्त ठरतो.
२. लसूण
लसणात डायलिल डिससल्फाईड हा घटक असतो तो दाह कमी करण्यास उपयुक्त असतो. त्यामुळे हाडांसाठी लसूण फायदेशीर ठरतो.
३. आलं
आलं हा आपल्या मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. शरीरात जळजळ किंवा दाह वाढवणाऱ्या पदार्थांवर आले गुणकारी ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात आवर्जून आल्याचा समावेश करायला हवा.
४. आक्रोड
आक्रोड हा सुकामेव्यातील एक प्रमुख पदार्थ आहे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने दुखणे कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात आक्रोडाचा आवर्जून समावेश करायला हवा.