कोलेस्टेरॉल हा शब्द आपण सध्या बरेचदा ऐकतो. रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी किंवा जास्त होणे या समस्या सध्या अनेकांना भेडसावतात. अगदी लहान वयातील व्यक्तींनाही या समस्या भेडसावताना दिसतात. वाढलेले ताणतणाव, खाण्यापिण्याच्या पद्धती, व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधिनता यांसारख्या जीवनशैलीतील गोष्टींचा शरीरावर परीणाम होतो आणि मग मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा समस्या उद्भवतात. आजकाल वयाच्या तिशीतच हे त्रास होत असल्याचे आपल्याला दिसते (5 hidden signs of cholesterol) .
मधुमेह किंवा रक्तदाब कमी-जास्त झाला तर त्याची काही लक्षणे असतात. त्यावरुन आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतोही. पण कोलेस्टेरॉल ही अशी गोष्ट आहे की सामान्यपणे त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि मग एकाएकी हृदयारोगाशी निगडीत समस्या भेडसावल्यावर आपल्याला कोलेस्टेरॉल असल्याचे कळते. रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजुला एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यामुळे रक्तवहन करण्याच्या कामात अडथळा निर्माण होतो.
हृदयाला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येतो. पण एकाएकी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी एकतर नियमित तपासण्या करायला हव्यात. त्याशिवाय कोलेस्टेरॉल वाढले आहे हे दाखवणारी काही किमान लक्षणे आपल्याला माहित असायला हवीत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ ही लक्षणे कोणती असतात त्याविषयी सांगतात...
१. डोळ्यांच्या बाजूला वेगळे डाग दिसतात.
२. कोलेस्टोरॉल वाढलेले असेल तर बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स २८ पेक्षा जास्त येतो.
३. थोडं जरी चाललं तरी दम लागल्यासारखे होते आणि धाप लागते.
४. छातीत दर काही वेळाने दुखते आणि अस्वस्थ वाटते.
५. अशा लोकांना फॅटी लिव्हरची समस्या असते.
यापैकी २ किंवा ३ लक्षणं जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण लगेचच औषधं सुरू करण्यापेक्षा आधी आहार आणि जीवनशैलीत बदल करुन तुम्ही या तक्रारी नियंत्रणात आणू शकता.