खूप पोट दुखतं, पोट आट मारतं, संडासला गेलं तरी थोडी थोडी चिकट संडासला होते अशी तक्रार अनेकजण करतात. पोटात मुरडा मारून चिकट, कफयुक्त अशी थोडी संडास होणं याला आव होणं असं म्हणतात. काहीजण आवेवर जुलाबाची औषधं घेतात. पण त्यामुळे मूळ आजार बरा होतोच असं नाही. काहींची आव इतकी वाढते की कधीकधी रक्त पडतं. आव हा चिवट आजार असतो. तो लवकर जात नाही.
आयुर्वेद तज्ज्ञ स्नेहल जोशी त्यावर उपाय सांगतात..
आवेवर उपचार काय?
१. मनाने अजिबात उपचार घेऊ नयेत उत्तम वैद्यकीय सल्ला घ्यावा. आयुर्वेदिक उपचार घेणार असाल तर तज्ज्ञ सांगतात ती आहाराची पत्थ्यं पाळावी.
२. लहानसा चमचा एरंडेल तेल गरम पाण्याबरोबर घेतलं तर पोट साफ व्हायला मदत होते. गंधर्व हरितकी किंवा त्रिफळा चूर्ण यासारखी चूर्ण घेऊ शकता.
३. हिंगाष्टक चूर्ण दोनही जेवणापूर्वी तूपात कालवून घेतल्यास पोटाला आराम मिळतो.
४. बेलाचा मोरावळाही थोडासा घ्यावा.
५. आहारात सुंठ घालून ताक घ्यावे. ताक पातळ असावे आणि आंबट असता कामा नये.
६. लहान मुलांना आव झाल्यास लाह्या, भाताची पेज, डाळींबाचा रस, ताक द्यावे.
७. मात्र हे झाले लहानसे बदल योग्य वैद्यकीय सल्ला घेतला नाही तर आव वाढते आणि हे दुखणं अत्यंत वेदनादायी असतं.
चुकतं काय?
अनेकजण आपल्याला आव झाली आहे हे मान्य करत नाहीत. अनेकजण हे मान्य करत नाहीत की रक्त पडतं. आव वारंवार होते. पोट खूप आट मारतं. काहींना जंतांचाही त्रास असतो. त्यात आहार सवयी चांगल्या नसतात. सतत रस्त्यावर, बाहेरचं खाणं,यानंही हे आजार बळावतात.
त्यामुळे दुर्लक्ष करु नका. वेळीच आहारबदल, औषधं यातून हे चिवट दुखणं बरं होऊ शकतं.