Lokmat Sakhi >Health >Adolescence > मुली दहाव्या वर्षी, मुलगे अकराव्या वर्षी वयात येतात, हे ‘नॉर्मल’ की अकाली वयात येण्याचा आजार?

मुली दहाव्या वर्षी, मुलगे अकराव्या वर्षी वयात येतात, हे ‘नॉर्मल’ की अकाली वयात येण्याचा आजार?

वयात येण्याचं वय कमी होतं आहे, त्यातून वजन-उंची लैंगिक भावना यांचे काही प्रश्न निर्माण होत आहेत, त्यासंदर्भात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:38 PM2021-03-30T13:38:43+5:302021-03-31T16:43:37+5:30

वयात येण्याचं वय कमी होतं आहे, त्यातून वजन-उंची लैंगिक भावना यांचे काही प्रश्न निर्माण होत आहेत, त्यासंदर्भात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

adolescents-precocious puberty-delayed puberty how to deal with this? | मुली दहाव्या वर्षी, मुलगे अकराव्या वर्षी वयात येतात, हे ‘नॉर्मल’ की अकाली वयात येण्याचा आजार?

मुली दहाव्या वर्षी, मुलगे अकराव्या वर्षी वयात येतात, हे ‘नॉर्मल’ की अकाली वयात येण्याचा आजार?

Highlightsपालकांनी सगळे मनातले गैरसमज, भीती, संकोच बाजूला ठेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. काहीही शंका असल्यास आपल्या जवळील हार्मोन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डॉ यशपाल गोगटे

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक बदल घडवणारा काळ याला पौगंडावस्था असे म्हणतात. उंची व लैंगिक बदलाबरोबर मानसिक व आकलन विषयक बदल या काळात घडत असतात. साधारणतः मुलींमध्ये बाराव्या वर्षी व मुलांमध्ये तेराव्या वर्षी हे अपेक्षित परिवर्तन घडत असते. सुप्त असलेली जननसंस्था एका विशिष्ट वयाला अचानक जागृत होते व पौगंडावस्थेला सुरवात होते. शरीरशास्त्राप्रमाणे बहुतेक करून योग्य वजन झाल्यावर हे बदल आढळतात. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुला- मुलींमध्ये चरबीचे प्रमाण वाढत चालले आहे. टीव्ही व सोशल मीडियाच्या अतिप्रभावामुळे मानसिक प्रगल्भता देखील लवकर येत आहे. त्यामुळे ठराविक टार्गेट वजन ही मुलं-मुली वया आधीच प्राप्त करतात. बहुतेक करून लवकर वयात येण्याचे हे एक मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे हे बद्दल आजकालच्या काळात मुलींमध्ये दहाव्या वर्षी व मुलांमध्ये अकराव्या वर्षी दिसून येतात. पण काही वेळेस हे बदल त्याही अगोदर होत असल्यास त्या आजाराला अकाली पौगंडावस्था (precocious puberty)असे म्हणता येईल.


अकाली पौगंडावस्था हा पालक व बालक दोघांसाठी अतिशय मानसिक तणाव आणणारा हार्मोनचा आजार आहे. बालकामध्ये तेवढी समज नसल्यामुळे हे शरीरात घडणारे बदल त्याला त्रासदायक ठरतात. त्यामुळे इतर मुला-मुलींपेक्षा आपण वेगळे आहोत या भावनेने न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पालक स्वतः देखील यामुळे चिंतीत होतात व काय करू हे समजत नसते. आपल्याकडे समाजात या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही त्यामुळे बरेच वेळा संकोचून, घाबरून जाऊन या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. पालकांनी या आजाराबद्दल सतर्क राहावे म्हणून काही लक्षणांचे गांभीर्य जाणून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 


मुलींमध्ये आठ वर्षाच्या आत स्तनांची वाढ, काखेत अथवा जांघेत केस येणे, पाळी येणे अशी लक्षणे आढळतात. तर मुलांमध्ये केस येणे, आवाज घोगरा होणे, राग लोभ तीव्र होणे व लैंगिक प्रेरणा येणे हे होऊ शकते. मुला-मुलींमध्ये अचानक उंची वाढीला वेग येणे हे देखील या आजाराचे लक्षण असू शकते. या आजारातील सर्वात मोठा शारीरिक तोटा म्हणजे लवकर सेक्स हार्मोन्स सक्रिय झाल्यामुळे हाडांची वाढ थांबते व सुरवातीला तुलनेने उंच वाटणारी मुले पुढे जाऊन मात्र बुटकी राहतात. या आजाराकरता अनेक कारणे असू शकतात. तज्ज्ञ डॉक्टर योग्य त्या तपासण्या करून आजाराचे निदान कायम करतात. वेळेवर केलेल्या औषधोपचाराने काही प्रमाणात होणारा मानसिक ताण व उंचीचा तोटा नियंत्रणात ठेवता येतो.


या आजाराची दुसरी बाजू म्हणजे किशोरवयीन मुला- मुलींमध्ये हे बदल उशिरा दिसून येणे. याला delayed puberty अथवा उशिरा येणारी पौगंडावस्था असे म्हणता येईल. मुलींमध्ये वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत व मुलांमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत जर काहीच लैंगिक बदल झाले नसतील तर या आजाराची लक्षणे असू शकतात. अनेकवेळा या आजारामध्ये उंची देखील कमी राहू शकते. त्यामुळे बरोबरीच्या वयाच्या मुला-मुलींपेक्षा उंची कमी असल्यास पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असते. हा आजार बरेच वेळा सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून योग्य तो उपचार घेतल्यास फायदा होतो.
पौगंडावस्थेच्या या दोन्हीही विकारांमध्ये लवकर निदान झाल्यास योग्य त्या उपचारांनी नैसर्गिक वाढ होते. पुढील समस्या टाळता येतात. त्यामुळे पालकांनी सगळे मनातले गैरसमज, भीती, संकोच बाजूला ठेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. काहीही शंका असल्यास आपल्या जवळील हार्मोन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

( लेखक नाशिकस्थित प्रख्यात एंडोक्रिनॉलॉजिस्ट, हार्मोन तज्ज्ञ आहेत.)
dryashpal@findrightdoctor.com

Web Title: adolescents-precocious puberty-delayed puberty how to deal with this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.