Lokmat Sakhi >Health >Adolescence > सावधान, घरात तासनतास स्क्रीनसमोर बसून मुलं झाली लठ्ठ, हातातला मोबाइल आजारांना आमंत्रण

सावधान, घरात तासनतास स्क्रीनसमोर बसून मुलं झाली लठ्ठ, हातातला मोबाइल आजारांना आमंत्रण

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण असो की खेळणं, जे काही असेल ते घरातच असलं पाहिजे हा पालकांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे मुलांच्या बाहेर जाऊन खेळण्यावर अनेक बंधनं आली आहेत. त्यातून मुलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 01:34 PM2021-07-06T13:34:33+5:302021-07-06T13:38:39+5:30

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण असो की खेळणं, जे काही असेल ते घरातच असलं पाहिजे हा पालकांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे मुलांच्या बाहेर जाऊन खेळण्यावर अनेक बंधनं आली आहेत. त्यातून मुलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.  

Beware, children sitting in front of the screen for hours at home became obese, mobile in their hands inviting diseases | सावधान, घरात तासनतास स्क्रीनसमोर बसून मुलं झाली लठ्ठ, हातातला मोबाइल आजारांना आमंत्रण

सावधान, घरात तासनतास स्क्रीनसमोर बसून मुलं झाली लठ्ठ, हातातला मोबाइल आजारांना आमंत्रण

Highlightsमुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यांच्या खाण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांच्यामध्ये स्थूलता वाढत आहे. पालकांनी मोबाइल, लॅॅपटॉप, टीव्ही आदींवरील मुलांचा स्क्रीन टाइम शक्य तितका कमी करावा. मुलांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा. कारण मुलांना ताण आल्यानेही ते जास्त खातात आणि त्याचा त्यांच्या वजनावर परिणाम होतो. 

- संतोष मिठारी 

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लहान मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यांना मैदानावर खेळायला जाण्यावर बंधनं आली आहेत. त्यांना घरी बसून ऑनलाइन शिक्षण घ्यावं लागतय. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. एकाच जागी बसण्याचं प्रमाण वाढल्यामुळे  मुलांच्या वजनात वाढ होत असून  आरोग्याचे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पालक आपल्या मुलांना घराबाहेर सोडण्यास तयार नाहीत. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण असो की खेळणं, जे काही असेल ते घरातच असलं पाहिजे हा पालकांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे मुलांच्या बाहेर जाऊन खेळण्यावर अनेक बंधनं आली आहेत.  त्यातून साहजिकच मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यांच्या खाण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांच्यामध्ये स्थूलता वाढत आहे. त्यातून पाठदुखीसह  स्थुलतेशी निगडित रक्तदाब वाढणे, मधुमेह, हृदयाशी संबंधित आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. ते टाळून मुलांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम या त्रिसूत्रीनुसार पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं बालरोग तज्ज्ञ सांगत आहेत. 

 

मुलांचं वजन वाढतंय कारण

मुलांना घरातून बाहेर जाता येत नाही .  ऑनलाइन शिक्षणामुळे  त्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे.  मुलं मोबइल घेऊन एकाच ठिकाणी दोन ते तीन तास बसून  राहात आहे. सायकलिंग आणि मैदानी खेळ थांबल्याने त्यांच्या  शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. घरातच असल्यानं त्यांचं खाणंही वाढलं आहे. या सर्व कारणांनी मुलांचं वजन वाढतंय.

काय काळजी घ्यायला हवी? 

१) पालकांनी मोबाइल, लॅॅपटॉप, टीव्ही आदींवरील मुलांचा स्क्रीन टाइम शक्य तितका कमी करावा.
२) फास्ट फूडऐवजी त्यांना घरगुती आणि समतोल आहार द्यावा.
३) सूर्यनमस्कार, दोरी उड्या, उठाबशा, रस्सीखेचीसह शालेय कवायतीमधील प्रकार मुलांकडून करून घ्यावेत.
४) मुलांना योगासने करण्यास प्रवृत्त करावे.
५) मुलांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा. कारण मुलांना ताण आल्यानेही ते जास्त खातात आणि त्याचा त्यांच्या वजनावर परिणाम होतो. 

 

 

डॉक्टर म्हणतात...
कोरोनामुळे घरातून बाहेर जात येता नसल्यानं मुलांचा स्क्रीन टाइम वाढला हे खरं आहे. शारीरिक हालचाल कमी झाल्याने आणि  एका जागी बसून खाणं वाढल्याने अनेक मुलांचं वजन वाढत आहे.  काही मुलांचं तर तीन ते पाच किलो इतकं वजन वाढलं आहे. नैराश्यामुळे काही मुलांचं वजन कमी झालं आहे. मुलांमध्ये वजनाच्या बाबत  असंतुलन निर्माण झाल्याचं दिसत आहे. मुलांचं आरोग्य चांगलं  ठेवण्यासाठी आणि त्यांच्या वाढत्या वजनाचा किंव वजानातील असमतोलाचा प्रश्न सोडवायचा असल्यास  पालकांनी लक्ष घालावं. पालकांनी त्यांना योग्य आहार द्यावा. त्यांची पुरेशी झोप होवू द्यावी. मुलांकडून नियमित  व्यायाम करून घ्यावा.

-डॉ. मोहन पाटील, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ
 
मैदानी खेळ हाच पर्याय

शारीरिक हालचाल कमी झाल्याने मुलांमध्ये स्थूलता वाढत असून त्याच्या निगडित विकार त्यांच्यामध्ये उद्भवत आहे. ते टाळण्यासाठी पालकांनी त्यांना योग्य आहार द्यावा. गच्ची, अंगणात घरगुती खेळ घ्यावेत. त्यांचा स्क्रीन टाइम कमी करावा. त्यांना फास्टफूड देवू नये.

-डॉ. अमर नाईक, बालरोगतज्ज्ञ

 

टीव्ही- मोबाइलचा नवीनच प्रश्न  

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना असल्याने माझ्या दोन्ही मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना घरातून बाहेर सोडता येत नाही. त्यामुळे मोबाइल, टीव्ही सोडतच नाहीत. ही नवी समस्या निर्माण झाली आहे.

- रूपाली हेंबाडे, पालक

प्रश्न आहे पण  उत्तरही शोधतो आहोत!

माझी मुलगी चौथीमध्ये आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे तिला मोबाइलची सवय लागली आहे. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होत आहे. तिचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी तिला थोडे घरगुती खेळ, शाळेतील कवायतीचे प्रकार करायला लावत आहोत.
- अनिल पोतदार, पालक.

(लेखक  लोकमतच्या कोल्हापूर आवत्तीत सहाय्यक उपसंपादक आणि बातमीदार आहेत. )
santaji.mithari@gmail.com

Web Title: Beware, children sitting in front of the screen for hours at home became obese, mobile in their hands inviting diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.