आपलं अख्खं शरीर जीवजंतूंसाठी सुपीक आगार असतं. योग्य काळजी घेतली नाही तर तिथं जीव-जिवाणू, जंतू नुसतं घर करतात असं नाही तर ते उदंड वाढतात. शरीरावर पांघरलेल्या त्वचेशिवाय जिथं जिथं म्हणून शरीरावर छिद्रं अथवा ओपनिंग्ज असतात तिथं जंतूंच्या प्रसाराची शक्यता असते. शरीराबाहेर असणारे जीवजंतू, विषाणू अशा ओपनिंग्जमधून शरीरात प्रवेश करतात नि आपण आजारी पडतो. म्हणूनच आपल्या शरीराची स्वच्छता राखणं व त्यासाठी विशिष्ट सवयी स्वत:ला लावून घेणं खूप गरजेचं आहे.
खालील सवयी स्वत:त रूजवून घेण्यातून शरीर निरोगी नि सुदृढ राहतं! सगळ्यांना वाटतं की हे आपल्याला माहितीच आहे, यात नवीन ते काय? पण वयात येताना या वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावूनच घेतल्या पाहिजेत.
त्यासाठी या काही आवश्यक सवयी.
1. अंघोळ : दररोज अंघोळ करणं हा रोगजंतूंना शरीरापासून लांब ठेवण्याचा हमखास, सोपा आणि खात्रीशीर उपाय.
केस धुणं : अंघोळ जशी दररोज तसाच नियमितपणा हवा आठवड्यातून किमान एकदा शांपू अगर साबणानं केस धुण्याबाबतीत.
2. दात घासणं : दात किडू नयेत, हिरड्या मजबूत राहाव्यात म्हणून दिवसांतून दोनदा दात घासणं फार गरजेचं. प्रत्येक वेळी खाणं झालं की चूळ भरणं नि दोन्ही जेवणानंतर दात घासण्यानं तोंडात होऊ पाहणार्या जंतूंना अटकाव होतो.
3. हात धुणं : वेळोवेळी हात धुणं ही स्वच्छतेच्या एकूण मार्गांपैकी सगळ्यात महत्त्वाची सवय आहे. जेवणाच्या आधी व नंतर शिवाय स्वच्छतागृहातून बाहेर आल्यावर हात धुणं जसं महत्त्वाचं तसंच कामावरून आल्यावर, खेळून झाल्यावर, बागकाम आटोपल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी साबण किंवा हॅण्डवॉशने चोळून हात धुणं अतिशय आवश्यक आहे. हातावर नि नखांमध्ये रोगजंतू जास्त लवकर फोफावतात, त्यामुळंच हात धुण्याची सवय आरोग्यदायी!
4. साबणाने कपडे धुणं : कपड्यांवर असणार्या जीवजंतूंमुळं वेगवेगळ्या ठिकाणी जंतूंचा प्रसार होण्याची शक्यता मोठी असते, त्यामुळेच कपडे धुण्याची पावडर अथवा साबण वापरून कपडे नीट खळबळून धुणं फार गरजेचं.
5. खोकताना/शिंकताना तोंड झाकणं : खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणं ही सवय आपण शिष्टाचार म्हणून पाळत असू तर चांगलंच आहे. कारण तोंड उघडं ठेवल्यानं समोरच्या माणसांवर, वस्तूंवर जे तुषार उडतात त्यातून रोगांना चालना मिळू शकते. कोविडमध्ये तर हे चांगलंच लक्षात आलं आहे.
6. अती गर्दीची ठिकाणे टाळणं : नेहमीच असं शक्य होत नाही, पण कारण नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्यातून रोगजंतूंच्या आपल्या शरीरात होणार्या प्रसाराला आळा बसतो. असंख्य लोकांच्या श्वास-उच्छ्वास नि स्पर्शातून रोगजंतूंचं वहन हवेत सहजपणानं होत असतं.
7. सांडपाण्याची व्यवस्था : कचरा, सांडपाणी नि मैला वहनाची कडेकोट व्यवस्था असणं खूप गरजेचं. सांडपाणी वाहून नेणारे चॅनल्स झाकलेले असणं अत्यावश्यक. त्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहते नि पर्यायाने रोगजंतूंना आळा बसतो.
रोगजंतू, जिवाणू यांच्या फैलावाचा वेग प्रचंड असतो. त्यामुळं जिथं त्यांचा प्रसार होऊ शकतो अशी ठिकाणं समजून घेऊन स्वच्छतेची व्यवस्था नि सवय लावणं मानवी आरोग्यासाठी अतिशय हितकारी आहे. पर्सनल हायजिनच्या सवयी अंगी बाणवण्यानं आपण स्वत:ची तब्येत उत्तम राखू शकतोच, पण आपल्या आसपासच्या लोकांची व पर्यावरणाचीही काळजी सहजपणानं घेऊ शकतो. त्यातून आजारांचं संक्रमण वेळीच थांबतं.