सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे हात खरखरीत होणं, हातांवर फोडं येणं, हात कडक होणं.. असं सगळं ऐकलं होतं. आणि त्यचा अनुभवही अनेकांनी घेतला होता. पण सॅनिटायझरचा (sanitizer) अतिवापर केल्याने मुलींना कमी वयातच मासिक पाळी सुरु होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांनी यासंदर्भात नुकताच एक अभ्यास केला. यात असं निदर्शनास आलं की कोरोना, लॉकडाऊन यानंतर मुलींना कमी वयातच मासिक पाळी (menstrual periods in early age) आल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी दवाखान्यात येणाऱ्या पालकांची आणि मुलींची संख्या ३. ६ टक्क्यांनी वाढली आहे. शिवाय ८ ते ९ वर्षांच्या मुलांमध्येही किशोरावस्था लवकरच सुरू होणार असल्याची लक्षणं दिसून आली आहेत.
याविषयी नुकतेच Paediatric Endocrinology and Metabolism जर्नल प्रकाशित करण्यात आले असून त्यातही जगभरातील अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. इटलीमध्ये कोरोनानंतर कमी वयातच किशोरावस्थेची लक्षणे दिसून येणाऱ्या मुला- मुलींच्या संख्येत चांगलीच वाढ दिसून आली आहे. पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये याविषयीचा अभ्यास करण्यासाठी २ ग्रुप तयार करण्यात आले आहेत. पहिला ग्रुप प्री कोविड आहे, तर दुसरा ग्रुप पोस्ट कोविड आहे. त्यानुसार असं लक्षात आलं की कोविडपुर्वी अशी समस्या केवळ ५९ मुला- मुलींमध्ये दिसून आली. यापैकी ५४ मुली होत्या, तर ५ मुलं होते. पण कोविडनंतर ही संख्या मात्र १५५ पर्यंत वाढली आहे. यापैकी १४६ मुली आहेत तर ९ मुलं आहेत.
याविषयी idiva शी बोलताना डॉ. अनुराधा खादिलकर यांनी सांगिमतले की मुलींमध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात दिसते आहे. याचं एक कारण सॅनिटायझरचा अतिवापर हे असू शकतं. कारण हँड सॅनिटायझर किंवा काही साबणांमध्ये टायक्लोजन नावाचं केमिकल असतं. या केमिकलशी जर वारंवार संबंध आला तर कमी वयातच पाळी सुरू होऊ शकते. अशीच काही उदाहरणे कोविडनंतरच्या काळात दिसून आली. खूप दिवस घरात बसून असल्याने वजन गरजेपेक्षा जास्त वाढलेले वजन हे देखील यामागचे एक कारण असू शकते, असंही त्यांनी सांगितलं.
ही देखील आहेत लवकर वयात येण्याची कारणे...
याविषयी सांगताना डॉ. वामन खादिलकर म्हणाले की मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा अतिवापर, खूप जास्त कॅलरीज असणाऱ्या पदार्थांचे वारंवार सेवन, झोपेचे कमी झालेले प्रमाण तसेच व्हिटॅमिन डी ची कमतरता ही देखील लवकर वयात येण्यामागची काही कारणे आहेत.