जेवणानंतर सुस्ती येणे ही वरवर पाहता अगदीच सामान्य गोष्ट. पण ही बाब वाटते तेवढी सोपी नाही. कारण सुस्ती येण्याचा संबंध थेट तुमच्या पचन संस्थेशी आहे. यात आणखी भर म्हणजे जेवण झाले की सुस्ती येते, इथेच ही गोष्ट थांबत नाही. सुस्ती येताच अनेक जण ढाराढूर झोपतात, ही आणखीनच धोकादायक बाब आहे. या सवयीमुळे लठ्ठपणा येऊन पोट तर सुटतेच पण पचन संस्थेशी संबंधित अनेक आजारही उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात काही साधे सोपे बदल केले तर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अशा अनेक समस्या नक्कीच टाळता येतात. याशिवाय अशा सवयीचा त्रास विद्यार्थ्यांनाही खूप येतो. अभ्यासासाठी राखून ठेवलेला त्यांचा वेळ मग नकळतच निद्रादेवीच्या स्वाधीन करावा लागतो.
घरी राहणाऱ्या महिलांसाठी दुपारचे जेवण म्हणजे एक सोहळा असतो. वरण, भात, भाजी, पोळी, नाना प्रकारच्या चटण्या, लोणचे, दही, दुध, ताक, झालेच तर एखादा तळलेला पापड, घरात असलेला एखादा लाडू असे अनेक पदार्थ ताट भरून घेतले जातात आणि भरपेट जेवण केले जाते. अनेक जणी तर ऑफिसमध्येही असाच डबा नेतात. घरी राहणाऱ्या महिला मग असे जेवण झाल्यानंतर ताणून देतात आणि ऑफिसमध्ये असणाऱ्या वर्किंग वुमनला मात्र डोळ्यांवर चढलेली सुस्तीची झालर हटविण्यासाठी चहा आणि कॉफीचे अनेक मग संपवावे लागतात.
दुपारच्या जेवणानंतर झोप का येते ? रात्री जड खाणे पचत नाही, म्हणून अनेक जण दुपारीच हेवी फुड घेणे पसंत करतात. तळलेले, तुपकट, अधिक गोड आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असणारे पदार्थ दुपारी जेवणात घेतले की, आपल्या पचन संस्थेला हे सगळे जड अन्न पचविण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. अन्न पचविण्यासाठी शरीराला खूप उर्जा निर्माण करावी लागते. आतड्यांना हे सगळे अन्न पचविण्यासाठी अनेक एन्झाईम्स तयार करावे लागतात आणि त्यासाठी जास्तीतजास्त रक्त पुरवठा या भागाकडे केला जातो. यामुळे मेंदूकडे कमी प्रमाणात रक्त पुरवठा होऊ लागतो आणि मेंदूची क्रियाशीलता मंद गतीने होऊ लागते. त्यामुळे गुंगी येते.
दुपारी झोप न येण्यासाठी आहारात करा हे बदल १. दुपारच्या जेवणात कमीतकमी कॅलरीज खाव्या. २. जेवणानंतर लगेचच फळे खाणे टाळा. ३. गोड पदार्थ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात घेणे टाळा. नाष्टा आणि दुपारचे जेवण किंवा दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या दोघांमध्ये जो वेळ असतो, त्यामध्ये गोड पदार्थ खा. ४. तळलेेले, तुपकट पदार्थ किंवा शिळे पदार्थ खाणे टाळा. ५. अगदी भरपेट न जेवता पोटात थोडी जागा ठेवा.