किशोरवयात मुलं मुली आपल्या आवडी निवडीच्या बाबतीत खूपच आग्रही असतात. हे आग्रह बहुतांशवेळा नखऱ्यांकडे झुकलेले असतात. त्यांना जर महत्त्व दिलं आणि ज्याला महत्त्वं द्यायचं आहे ते पोषण जर दुर्लक्षिलं गेलं तर मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने ते घातक ठरतं. तज्ज्ञ सांगतात, किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे लक्ष देणं गरजेचं असतं. याकडे दुर्लक्ष झाल्यास होणारा परिणाम केवळ तात्कालिक नसून भविष्यात त्यांच्या जननक्षमतेवरही किशोरवयात होणाऱ्या पोषणाचा- कुपोषणाचा परिणाम होतो.
Image: Google
टीनएजर मुलींना का असते पोषणाची गरज?
1. तज्ज्ञ म्हणतात, की किशोर वय म्हणजे असा टप्पा जेव्हा शारीरिक वाढ झपाट्यानं होत असते. बाल्यावस्थेनंतर झपाट्यानं वाढ होण्याचा काळ म्हणजे किशोरावस्था. किशोरावस्थेत होणाऱ्या शारीरिक वाढीला पोषणाची मोठी गरज असते. आणि जर किशोरावस्थेतील मुली एखादा खेळ खेळत असतील, एखाद्या आरोग्यविषयक कारणांमुळे स्पेशल डाएटवर असतील किंवा खाण्याच्या बाबतीत या वयातल्या मुलींना जर काही विकृती असेल तर या परिस्थितीत या मुलींची पोषणाची गरज वाढलेली असते.
2. वयात येण्याच्या प्रक्रियेमुळे शारीरिकदृष्ट्या खूप बदल होतात. त्याचा परिणाम म्हणजे शरीराला पोषक घटकांची गरज जास्त पडते.
3. किशोरावस्थेतील मुलींच्या आहाराद्वारे होणाऱ्या पोषणात जर काही कमतरता राहिली तर मात्र भविष्यात त्यांच्या आरोग्यावर किशोरावस्थेतील पोषण अभावाचा गंभीर परिणाम होतो. त्यमुळे या वयातील मुलींच्या पोषणकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं.
Image: Google
पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास...
किशोरावस्थेतील मुलींच्या पोषणाबाबतचा अभाव हा जर दीर्घकाळ राहिला आणि याकडे पालकांनी दुर्लक्ष केलं तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होतात.
1. पोषणाचा अभाव किशोरवयीन मुलींमधे दीर्घकाळ राहिला तर या वयात मुली त्यांच्या पूर्ण क्षमतेनं शिकू शकत नाही, काम करु शकत नाही.
2. या वयातील पोषणाच्या अभावाचा परिणाम लैंगिक परिपक्वतेवर, मुलींच्या वाढीवर आणि विकासावर होतो. , त्वर आणि विकासावर होतो.
3. पौंगडावस्थेतील आणि किशोरवयातील मुलींच्या पोषणात सातत्याने अभाव दिसल्यास त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यातील जननक्षमतेवर होतो आणि त्याचा प्रभाव कायमस्वरुपी राहातो.
Image: Google
किशोरावस्थेतील मुलींच्या पोषणासाठी काय महत्त्वाचं?
शारीरिक, बौध्दिक विकास, लैंगिक परिपक्वता आणि जननक्षमता याचा विचार करता किशोरवयीन मुलींचं पोषण आहारातील पोषक घटकांद्वारे व्यवस्थित होवू शकतं. फक्त यासाठी पालकांनी खाली दिलेल्या मुद्यांचा विचार करुन त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.
1.नियमित आहारात फळं, भाज्या, प्रथिनं, दूध आणि दुधाचे पदार्थ आणि तेल यांचा समावेश असावा.
2. संपृक्त म्हणजे विरघळणारे फॅटस, जास्त साखर घातलेले पदार्थ आणि जास्त सोडियमयुक्त पदार्थांचा समावेश आहारात नियंत्रित असावा.
3. सर्व वर्गीय अन्न घटकांचा आहारात समावेश करताना त्यातील पोषणमुल्यांची घनता जास्त असण्याकडे लक्ष द्यायला हवं.
Image: Google
आवश्यक पोषक घटक आणि त्याचे स्त्रोत
किशोरावस्थेतील मुलींच्या आहारात प्रामुख्याने पुढील् पोषक घटक आहारातून मिळणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
1. नैसर्गिक प्रथिनांसाठी डाळी, तृणधान्यं, हिरव्या भाज्या, मासे आणि मांसाहारी पदार्थ.
2. कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे सोयाबीन, टोफू, सुकामेवा, दुधाचे पदार्थ
3. लोहयुक्त पदार्थ जसे शेंगवर्गीय भाज्या, गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, मटार, लोहयुक्त खाद्यपदार्थ
4. ड जीवनसत्त्वयुक्त पदार्थ- नाश्त्याला खाल्ले जाणारे तृणधान्य, माशांचं तेल, तूप, बटर
5. क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ जसे लिंबू, द्राक्षं, बटाटे, टमाटे आणि संत्री
6. फोलेटयुक्त पदार्थ- हिरव्या भाज्या, तृणधान्यं या सर्व पोषण घटकांचा समावेश किशोरवयातील मुलींच्या नियमित आहारात असायलाच हवा असं तज्ज्ञ सांगतात.
पोषण ही बाब आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाची कशी हे सांगताना तज्ज्ञ एक समीकरण सांगतात. योग्य, चांगला आणि पोषणयुक्त आहार = सुदृढ बालपण आणि निरोगी प्रौढत्व.
पोषणाचं हे समीकरण रोजच्या आहारात आपण जमवून आणतो की नाही याकडे म्हणूनच पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.