जगभर अनेक देशांमध्ये कौटुंबिक लैंगिक छळाच्या घटना घडतात आणि घराच्या चार भिंतीतच दबून जातात. अशा प्रसंगांबद्दल घरातलेच गप्प बसल्यामुळे या घटना कधीच जगासमोर येत नाहीत. आणि छळ करणाऱ्या व्यक्तीला शिक्षाही होत नाही. कौटुंबिक लैंगिक हिंसेमध्ये दोन तीन बाल लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश असतो. खरंतर खरा आकडा यापेक्षाही बराच मोठा असू शकतो पण या घटनांच्या तक्रारीच दाखल होत नसल्यामुळे नेमका आकडा सांगता येणं कठीण आहे.
कौटुंबिक लैंगिक छळ म्हणजे काय?
कुटुंबातल्या कुटुंबात होणाऱ्या अथवा केल्या जाणाऱ्या लैंगिक छळाला कौटुंबिक लैंगिक छळ म्हटलं जातं. या प्रकारात कुटुंबातील लहान मूल किंवा प्रौढ व्यक्तीवर लैंगिक अत्याचार होतात. आणि अत्याचार करणारी व्यक्तीही कुटुंबातीलच असते. अत्याचार करणारी व्यक्ती रक्ताची नातेसंबंधी असतेच असं नाही. काहीवेळा कुटुंबाच्या खूप चांगल्या परिचयाची, फॅमिली फ्रेंड्स असणारी, कुटुंबाच्या अगदी जवळ असलेली व्यक्ती असू शकते. आपला ज्या व्यक्तीवर विश्वास असतो, ज्या व्यक्तीविषयी स्नेह असतो तीच व्यक्ती आपला लैंगिक छळ करते ही भावना अतिशय त्रासदायक असते. त्याचा ताण मनावर येतो. ज्यातून नैराश्य, अपराधीपणाची भावना, बदला घेण्याची तीव्र इच्छा, अवहेलना, अविश्वास आणि लाज अशा अनेक भावना मनात निर्माण होऊ शकतात. या भावनांशी दोन हात करणं तितकं सोपं नाही. घडलेली घटना विसरून पुन्हा आयुष्य जगायला सुरुवात करणंही सोपं नाहीच. या दोन्ही गोष्टींसाठी वेळही द्यावा लागतो आणि प्रचंड मानसिक ताकद खर्च करावी लागते. शोषितांना कुटुंबाच्या आधाराची तर गरज असतेच पण त्याचप्रमाणे कुटुंबाच्या मित्रपरिवाराची आणि इतर नातलगांच्या आधाराची गरज असते. समाज, पोलीस यंत्रणा, कायदेतज्ज्ञ आणि समुपदेशकांच्या मदतीचीही आवश्यकता असते. पण अनेकदा अशा प्रसंगात कुटुंबाकडूनच आधार मिळत नाही.
कुटुंबाकडून आधार का नाकारला जातो? १) लैंगिक छळ झाला आहे हेच अनेकदा कुटुंबांना मान्य नसतं. २) शोषितालाच (व्हिक्टीम) दोष देण्याची वृत्ती असते. ३) जे झालं ते झालं विसरून जा, आणि पूर्वी काय झालं याचा विचार करू नको असं वारंवार सांगून विषय बंद करण्याची वृत्ती ४) व्हिक्टीमला बोलू न देण्याची, त्याच्याबरोबर घडलेली घटना मोकळेपणाने सांगू न देण्याची वृत्ती ५) कुटुंबाला अनेकदा कुणाचीच बाजू घ्यायची नसते. ना शोषण करणाऱ्याची ना व्हिक्टीमच्या बाजूने उभं राहण्याची तयारी असते. अशावेळी बाजू घ्यायलाच लागू नये यासाठी विषय दाबला जातो. ६) काहीवेळा शोषण करणाऱ्याशी चांगलं वागण्यासाठी शोषितांना भाग पाडून विषयवार पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जातो.
मदत कुठे मिळू शकते? आपल्या आजूबाजूला अनेक संस्था आहेत ज्या लैंगिक हिंसा, कौटुंबिक हिंसा, कौटुंबिक लैंगिक शोषणाविरोधात काम करत असतात. महिलांसकट सर्व सामाजिक घटकांसाठी जगणं सहज आणि सोपं असायला हवं यासाठी अनेक संस्था काम करत असतात. अनेक संस्था कायद्यातील बदलांसाठी काम करत असतात. अनेक संस्था जनजागरणाच्या कामात असतात. या संस्थांकडून अशा प्रसंगी मदत मिळू शकते. काही महत्वाच्या संस्था याप्रमाणे १) आझाद फाउंडेशन २) भारतीय ग्रामीण महिला संघ ३) आयसीआरडब्ल्यू ४) निर्भया केंद्र ५) लॉयर्स कलेक्टिव्ह
संस्था कशी मदत करतात? या संस्थांमध्ये समुपदेशक असतात. जे लैंगिक शोषण झालेल्या व्यक्तीला घडलेल्या घटनेतून बाहेर पाडण्यासाठी मदत करतात. समुपदेशनामुळे मनावरही ताण कमी होतो. अस्वस्थता कमी होते. आवश्यक ती मदत मिळाल्यास एकूण कुटुंबात जो ताण निर्माण झालेला असतो तो कमी होऊन आयुष्य पूर्ववत आणण्यासाठी मदत मिळू शकते. - हिंसक परिस्थिती आणि धमक्यांपासून स्त्रियांचे रक्षण - महिलांना आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न - लैंगिक आणि शारीरिक छळतील व्यक्तींना कायदेशीर मदत - मानसिक आघातातून बाहेर पाडण्यासाठी समुपदेशन खरंतर, बाहेरच्या मदतीआधी पालकांचा आधार अशा घटनेत सगळ्यात महत्वाचा असतो. कौटुंबिक लैंगिक छळाच्या घटनांमध्येही पालकांचा आधार गरजेचा असतो. अनेकदा शोषण करणारी व्यक्ती कुटुंबातील असते, किंवा खूप जवळची असते, त्यामुळे तक्रार नोंदवली जात नाही, त्यात अडथळे येतात. पण घडलेली घटना कुटुंबात परत कधीही घडू नये किंवा दुसऱ्या कुणाच्याही बाबतीत घडू नये यासाठी ह्या गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या पाहिजेत. आपल्या समाजात असे अनेक छुपे राक्षस फिरत असतात. आपली मुलं आपल्याला काय सांगू बघतायेत याकडे पालकांनी बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. मुलांचं तोंड गप्प करण्यापेक्षा त्यांना मोकळेपणाने बोलण्याची संधी आणि तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे. मुलांना गुड टच, बॅड टच म्हणजे काय ते सांगितलं पाहिजे. त्यांच्याबरोबर काहीही चुकीचं घडलं तरी मुलांनी ते पालकांना घेऊन सांगितलं पाहिजे, इतपत विश्वास मुलांच्या मनात पालकांना तयार करता आला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत बळींना मदत ही मिळालीच पाहिजे.
विशेष आभार: डॉ. माधुरी मेहेंदळे
(MBBS, DGO, DNB- Obstetrics & Gynaecology)