कोणत्याही आजारपणापासून वाचायचं असेल तर काळजी घेणं हा सर्वात प्राथमिक उपाय आहे. ही काळजी घेण्याची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेपासून होते. वैयक्तिक स्वच्छता हा सुरक्षेचा पहिला उपाय आहे.वैयक्तिक स्वच्छतेला कमी महत्त्व देऊन आरोग्य राखता येत नाही हेच खरं. पण वैयक्तिक स्वच्छता म्हणजे नेमकं काय? ती कशी राखायला हवी याबाबत वयात आलेल्या मुला मुलींना सविस्तर मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. या टप्प्यात वैयक्तिक स्वच्छतेची संकल्पना नीट स्पष्ट झाली तर तिचा अवलंब व्यवस्थित आयुष्यभर होऊ शकतो. आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे विषाणू असतात. ते शरीरात निरनिराळ्या मार्गांनी प्रवेश करतात आणि आजार घेऊन येतात. पण आजारांना आमंत्रण देणाऱ्या या विषाणूंना शरीराच्या आत येऊ न देता बाहेरच्या बाहेर घालवून देणं सहज शक्य आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष दिलं पाहिजे.
वैयक्तिक स्वच्छता कशी कराल?
- रोजच्या रोज आंघोळ केलीच पाहिजे. साबणानं स्वच्छ आंघोळ केली की शरीरावर असलेले जिवाणू नष्ट होतात. आणि संसर्ग होत नाहीत.
- केस नियमितपणे धुतले गेले पाहिजेत. निदान आठवड्यातून एकदा केसांना साबण/शाम्पू लावून केसांची स्वच्छता केली पाहिजे. सकाळी उठल्यावर तर दात घासलेच पाहिजेत पण प्रत्येक जेवणानंतरही दातांची स्वच्छता गरजेची आहे.
- दात किडणं, तोंडाला घाण वास येणं या गोष्टी टाळायच्या असतील तर दातांची नियमित स्वच्छता गरजेची आहे.
- सुदृढ आरोग्यासाठी हातांची स्वच्छता गरजेची असते. अनेकदा रोगराई अस्वच्छ हातांमुळे शरीरात शिरते. जेवणाआधी आणि नंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. टॉयलेटला जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. बाहेरून आल्यावर, खेळून आल्यावर, बागकाम केल्यावर हात धुतले पाहिजेत. हात धुताना साबण, हॅन्ड वॉशचा वापर केला पाहिजे. स्वयंपाक बनवण्याआधी हात धुतले पाहिजेत. नखात घाण असेल तर आजार होऊ शकतात. त्यामुळे हात धुतांना नखं साफ राहतील हेही बघितलं पाहिजे.
- कपड्यांची स्वच्छताही तितकीच गरजेची आहे. डिटर्जंट, साबण वापरून कपडे धुतले पाहिजेत. कपड्यांवर किटाणू चटकन बसतात आणि तिथून आपल्या शरीरात शिरतात. त्यामुळे नेहमी धुतलेले स्वच्छ कपडेच वापरले पाहिजेत.
- जांभई देताना, खोकताना, शिंकताना नाका तोंडावर हात ठेवला पाहिजे. चारचौघांमध्ये नाकातोंडावर हात न ठेवता शिकणं, खोकणं, जांभई देणं असभ्यपणाचं लक्षण आहे. आणि धोकादायकही आहे. कारण त्यामुळे संसर्ग पसरू शकतात. अतिगर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत. कारण अशा ठिकाणी संसर्ग चटकन होऊ शकतो. एकाच घरात खूप माणसं राहात असतील तरी तिथेही संसर्ग चटकन होऊ शकतो, त्यामुळे स्वच्छतेबाबत काटेकोर असायलाच हवं. - संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढतात. त्यामुळे सांडपाण्याची नीट व्यवस्था हवी. घरातला कचरा वेळच्या वेळी टाकून दिला पाहिजे. आपण जिथे राहतो ती जागा स्वच्छ असेल तर आजार आपोआप दूर राहतात. आणि संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. - घाणीतून रोग -आजार पसरतात. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता तर गरजेची आहेच पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ असेल तर आजारपणाची शक्यता आपोआप कमी होते.
-विशेष आभार: डॉ. सुधा टंडन
MBBS, MD - Obstetrics & Gynaecology