डॉ. यशपाल गोगटे
वयात येताना म्हणजेच पौगंडावस्थेत काही विशिष्ट आजार होत असतात. मुला-मुलींमध्ये आढळणारा आणि पौगंडावस्थेशी निगडित असा खास आजार म्हणजे ' तारुण्य पिटिका' किंवा पिंपल्स. ते अनेकदा आपोआपच बरे होत असतात. काही वेळेस मात्र या आजाराकरता डॉक्टरांचा सल्ला व औषधे लागू शकतात. चष्मा लागणे, पाठीला कुबड येणे हे सुद्धा या वयात दिसणारे सामान्य आजार आहेत. पौगंडावस्थेत मुलींमध्ये ॲनेमिया म्हणजेच रक्त कमी होण्याची खूप जास्त शक्यता असते. अन्नातून योग्य प्रमाणात लोह न मिळाल्यास मुलींना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, उसळी- डाळी, धान्य वर्गातील घटक, मांस व काजू याचे योग्य प्रमाण असावे.
पौगंडावस्थेत अनेक मानसिक बदल देखील घडत असतात. त्यामुळे नैराश्य, चीड चीड करणे, टेन्शन येणे या सारखे मानसिक आजार देखील या वयात जास्त आढळतात. आई वडिलांनी आपल्या मुलांशी खुला मोकळा केलेला संवाद अशावेळेस मदतीचा ठरतो. काही वेळेस मात्र काऊन्सिलर अथवा मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. मुलांमध्ये आढळणारा पौगंडावस्थेतील एक आजार म्हणजे गायनेकोमास्टिया (gynecomastia). या विकारात मुलांमध्ये स्त्री सारखा छातीचा विकास होत असतो. पौगंडावस्थेत सुरवातीच्या काळात स्त्रियांचे हार्मोन इस्ट्रोजेन याचे अधिक प्रभुत्व असल्याने हा होतो. हा आजार नसून एक नैसर्गिक बदल आहे. बरेच वेळा वाढत्या वयाबरोबर हा आपोआपच बरा होतो. मात्र काही मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यास त्यावर औषधोपचार अथवा सर्जरी करता येऊ शकते. पौगंडावस्थाचे काळ हा लहानपण व तारुण्य यातील संधीकालच होय. या अवस्थेत मुला-मुलींमध्ये शारीरिक व मानसिक असे आमूलाग्र बदल होत असतात. त्यामुळे अश्यावेळेस मुला-मुलींना गरज असते ती समजून घेण्याची, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची व योग्य ती दिशा दाखवण्याची. त्यामुळे पिंपल्स आहेत, चेहरा खूप भरतोय म्हणून घाबरुन जाऊ नका. वयात येताना ते होतं, प्रमाण फार वाढलं तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)